मुंबई - ओडिशा येथील किनारपट्टीवर आलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पश्चिम किनारपट्टीवर मान्सून पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. मागील 24 तासांपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरात पावसाची संततधार सुरूच आहे. ठाणेमध्ये सर्वात जास्त पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.
गेल्या २४ तासांत , १९० मिलीमीटर पाऊस ठाण्यात झाला आहे. तर रत्नागिरीत 136 मिमी, अलिबाग 133 मिमी, सांताक्रुझ 131 मिमी, महाबळेश्वर 41 मिमी, सोलापूर 35 मिमी तर नागपुरात 30 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत तसेच कोकणात पुढील 4 दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
तसेच हवामान प्रणालींमुळे पुढील आणखी ४८ तास कोकण आणि गोवा तसेच मुंबई आणि उपनगरांत मान्सून सक्रिय राहील. दरम्यान, विदर्भात एक-दोन मुसळधार सरींसह मध्यम पाऊस पडेल. या काळात मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक आणि मालेगाव या ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. मात्र पुण्यामध्ये पावसाचे स्वरूप हलके राहील. पुढील २४ ते ४८ तासांत विदर्भालगतच्या मराठवाड्यातील काही भागांत एक ते दोन मध्यम सरींची शक्यता आहे. त्यानंतर, तीव्रता कमी होईल, परंतु विदर्भ, कोकण आणि गोवा येथे अधून मधून पाऊस चालू राहील असं स्कायमेट या हवामान संस्थेने सांगितले आहे.