उपनगरात पावसाचा जोर कायम
By admin | Published: July 12, 2016 02:58 AM2016-07-12T02:58:29+5:302016-07-12T02:58:29+5:30
तलावक्षेत्रात बरसणाऱ्या जलधारांनी सोमवारी मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरातही दमदार हजेरी लावली आहे. मागील चोवीस तासांत पूर्व आणि
मुंबई : तलावक्षेत्रात बरसणाऱ्या जलधारांनी सोमवारी मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरातही दमदार हजेरी लावली आहे. मागील चोवीस तासांत पूर्व आणि पश्चिम उपनगरात अनुक्रमे १३.१४, ७.५७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर शहरात मात्र तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या असून, येथील पावसाची नोंद अवघी ७.५७ मिलीमीटर एवढी आहे.
मागील आठवड्यातील चार दिवस शहर आणि उपनगरात पावसाने किंचितशी विश्रांती घेतली होती. रविवारी सकाळी काहीसा जोर पकडल्यानंतर पावसाने सायंकाळी मात्र पुन्हा हुलकावणी दिली. सोमवारी मात्र सकाळपासूनच पावसाने आपला वेग कायम ठेवला. शहरात कुलाबा, फोर्ट, भायखळा, दादर, वरळी, लालबाग आणि दादर परिसरापर्यंत पावसाने सकाळी हजेरी लावली. नंतर मात्र कुलाब्यापासून दादरपर्यंत पावसाने काही काळ विश्रांती घेतली. सायंकाळी पावसाने पुन्हा येथे हजेरी लावली असली तरी त्याचा मारा कमी होता. तर पूर्व उपनगरात सकाळपासून वेग पकडलेल्या पावसाने सायंकाळपर्यंत आपला मारा कायम ठेवला. सकाळी रिमझिम बरसणाऱ्या पावसाने पूर्व उपनगरात कुर्ला, घाटकोपर, विद्याविहार, भांडुप आणि विक्रोळी परिसरात दमदार हजेरी लावली. दुपारी बरसलेल्या दमदार जलधारांमुळे या परिसरात नागरिकांची काहीशी तारांबळ उडाली. दुसरीकडे पश्चिम उपनगरात वांद्रे, विलेपार्ले, अंधेरी, बोरीवली आणि गोरेगाव येथे सकाळी आणि दुपारी पडलेल्या पावसाने नागरिकांची दैना उडाली. (प्रतिनिधी)
पावसाचा मारा सुरू असतानाच मागील चोवीस तासांत शहरात २, पश्चिम उपनगरात २ अशा एकूण ४ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. तर शहरात ६, पूर्व उपनगरात ९ आणि पश्चिम उपनगरात १३ अशा एकूण २८ ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. दरम्यान, पावसाचा मारा सुरू असला तरी कोठेही पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या नाहीत. त्यामुळे शहर आणि उपनगरात पीक अवरची वाहतूककोंडी वगळता वाहतूक सुरळीत सुरू होती. दुसरीकडे पडणाऱ्या पावसाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी मरिन ड्राइव्ह, गिरगाव आणि जुहू चौपाटीवर मुंबईकरांनी केलेल्या गर्दीमुळे येथील उत्साहाला उधाण आल्याचे चित्र होते.