मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात थोडा तरी पाऊस पडला तरी सखल भागात पाणी साचते आणि मुंबई पाण्याखाली जाते. यावर मुंबई महापालिकेकडून उपाययोजना आखल्या जात असतानाच याचाच एक भाग म्हणून गझरबंध उदंचन केंद्र गुरुवारपासून पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाले असून, त्यामुळे आता वांद्रे (पश्चिम), सांताक्रूझ, खार या परिसरात पाणी तुंबणार नाही.महानगरपालिकेतर्फे एच/पश्चिम विभागातील गझरबंध उदंचन केंद्राचे लोकार्पण मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी गझरबंध उदंचन केंद्र, सुनील दत्त उद्यानाजवळ, जुहू-कोळीवाडा, सांताक्रूझ (पश्चिम) येथे पार पडले.गझरबंध उदंचन केंद्र कार्यान्वित झाल्याने दौलत नगर, शास्त्रीनगर, पी अॅण्ड टी आॅफिस, आरके मिशन मार्ग आणि लिकिंग रोड यांचा चौक, आरके मार्ग चौकाजवळील मनपा शाळा, चार व पाच मुख्य एन्हेन्यू मार्गावरील चौक, मीरा बाग कॉलनी, ग्रीन स्ट्रिट सांताक्रूझ (पश्चिम), इंदिरा नगर, खिरा नगर इत्यादी भागातील पावसाळ्यातील संभाव्य पूरस्थितीवर नियंत्रण मिळविता येणे शक्य होईल.दर सेकंदाला ३६ क्युबिक मीटर उदंचन क्षमता (६ क्युबिक मीटर प्रतिसेकंद क्षमतेचे ०६ पंप्स) तसेच पर्जन्य जल उदंचन केंद्र व पोहोच रस्त्यासाठी सुमारे ९२०० चौरस मीटर क्षेत्र शासनाकडून पालिकेला प्राप्त झाले आहे. पंप चालविण्यासाठी प्रत्येकी २२५० के.व्ही.ए. क्षमतेचे चार डिझेल जनित्र संच बसविण्यात आले आहेत. या पंपिंग स्टेशनला एसएनडीटी नाला आणि एव्हेन्यू नाला हे दोन मुख्य नाले येऊन भेटतात. या पंपिंग स्टेशनमुळे सांताक्रूझ, जुहू, खार रोड या परिसरातील पावसाचे पाणी जलदगतीने निचरा होईल.१२१ कोटी रुपये खर्च करून अद्ययावत पर्जन्य जल उदंचन केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.गझरबंध उदंचन केंद्रामुळे जुहू, खारदांडा, वांद्रे(पश्चिम) या भागात पाणी साचणार नाही. तसेच मिठी नदीच्या सौंदर्यींकरणासाठी महापालिकेने आतापर्यंत ६०० कोटी तर राज्य शासनाने ४०० कोटी रुपये खर्च केले आहेत. मिठी नदीला चांगले पर्यटनस्थळ बनविण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.- विश्वनाथ महाडेश्वर, महापौरमुंबई शहर सदैव स्वच्छ, सुंदर दिसावे म्हणून नागरिकांनी नाल्यात कचरा टाकू नये याची खबरदारी घ्यावी. जगातील उत्कृष्ट तंत्रज्ञान मिठी नदीच्या सौंदर्यीकरणासाठी आणण्याचा प्रयत्न सुरु आहे.- आदित्य ठाकरे,शिवसेना नेते
उपनगरात पावसाचे पाणी तुंबणार नाही, गझरबंध उदंचन केंद्र कार्यान्वित
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 3:13 AM