मुंबई : मागील चोवीस तासांपासून मुंबईत पावसाने पकडलेला वेग कायम असला तरी रविवारी सकाळपासून शहरात पावसाने विश्रांती घेतली. तर दुसरीकडे पूर्व उपनगरांत सकाळपासून सुरू झालेल्या पावसाने सायंकाळपर्यंत मारा कायम ठेवला आणि पश्चिम उपनगरांतही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. परिणामी शहरात ऊन आणि उपनगरांत पाऊस, असे चित्र निर्माण झाले होते. तर पुढील ४८ तासांत मुंबईत मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळतील, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.गुजरातवर आणि कर्नाटकपासून केरळपर्यंत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यासह मुंबईत पाऊस पडत असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. शुक्रवारी रात्री शहरात दमदार बरसलेल्या पावसाने मध्यरात्री विश्रांती घेतली. तर शनिवारी सकाळपासूनच पूर्व उपनगरांत पावसाच्या रिमझिम धारा बरसू लागल्या. येथे सकाळी १० वाजल्यापासून जोर पकडलेल्या पावसाने दुपारी दोन वाजेपर्यंत मारा कायम ठेवला होता. पूर्व उपनगरांत कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड परिसरात पावसाने धुमाकूळ घातला होता, तर पश्चिम उपनगरांत दमदार सरी बरसल्या. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे १४, १५, १६ आणि १७ सप्टेंबरपर्यंत गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा इशाराही हवामान खात्याने दिला आहे. (प्रतिनिधी)
उपनगरांत पावसाचा धुमाकूळ
By admin | Published: September 14, 2015 2:50 AM