विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर पावसाचे सावट, राज्यातील अनेक भागात मुसळधार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 20:24 IST2019-10-20T20:24:00+5:302019-10-20T20:24:13+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान होणार आहे. मात्र राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर पावसाचे सावट असल्याचे दिसत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर पावसाचे सावट, राज्यातील अनेक भागात मुसळधार
मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान होणार आहे. मतदान सुरळीत पार पडावे यासाठी निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे. मात्र राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर पावसाचे सावट असल्याचे दिसत आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, पुण्यासह कोकण आणि मराठवाड्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मतदानाच्या पूर्वतयारील फटका बसला आहे.
साताऱ्यात दुपारपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे पाल येथील मतदान केंद्र क्रमांक ३१ मध्ये पावसाचे पाणी शिरल्यामुळे हे मतदान केंद्र ग्रामपंचायत कार्यालय पाल येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातही अनेक मतदान केंद्रात गळती होत असल्याने निवडणूक कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली आहे. त्याबरोबरच कोकणातही पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे या पावसाचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
येत्या दोन तीन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता
दरम्यान, येत्या दोन तीन दिवसांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि गोव्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याचीही शक्यता आहे.