आज मेघगर्जनेसह पाऊस पडणार, हवामान खात्याचा इशारा, मुंबईत ऊन-पावसाचा खेळ सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 01:56 AM2017-10-01T01:56:38+5:302017-10-01T01:57:00+5:30
मध्य मुंबईत शुक्रवारी मुसळधार पाऊस कोसळला. त्यानंतर शनिवारी पावसाने विश्रांती घेतली असली तरी रविवारसह सोमवारी शहर आणि उपनगरात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.
मुंबई : मध्य मुंबईत शुक्रवारी मुसळधार पाऊस कोसळला. त्यानंतर शनिवारी पावसाने विश्रांती घेतली असली तरी रविवारसह सोमवारी शहर आणि उपनगरात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. ऊन-पावसाचा खेळ सुरू असतानाच आजपासून उष्णतेत भर घालणारा आॅक्टोबर महिना सुरू होणार असल्याने हळूहळू वाढती उष्णता मुंबईकरांना चांगलेच चटके देईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत रविवारसह सोमवारी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. १ आॅक्टोबर रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी कुलाबा आणि सांताक्रुझ येथे अनुक्रमे २८, २.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कमाल तापमान अनुक्रमे ३१ अंशाच्या आसपास नोंदविण्यात आले आहे. दरम्यान, येथील पडझड सुरूच असून, वडाळा येथील अवे मारिया इमारतीतील बंद खोलीच्या प्लास्टरचा भाग पडला. मुंबईत सात ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. चार ठिकाणी झाडे पडली. यात जीवितहानी झाली नाही.
उकाडा वाढणार
आजपासून आॅक्टोबर महिना सुरू होत असून त्यामुळे आता उकाडा अधिकच वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.