पावसाने जनजीवन विस्कळीत ,तिन्ही मार्गांवरील रेल्वेसेवा कोलमडली, वाहनांच्या लांब रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 05:23 AM2017-08-30T05:23:24+5:302017-08-30T05:23:56+5:30
पावसामुळे रस्तेच नव्हे, तर रेल्वे ट्रॅकवरही पाणी साचल्याने पश्चिम आणि मध्य रेल्वेचे सर्व मार्ग बंद पडले. त्यामुळे दक्षिण मुंबईतील चाकरमान्यांनी घराकडे धाव घेण्यास सुरूवात केली.
मुंबई: पावसामुळे रस्तेच नव्हे, तर रेल्वे ट्रॅकवरही पाणी साचल्याने पश्चिम आणि मध्य रेल्वेचे सर्व मार्ग बंद पडले. त्यामुळे दक्षिण मुंबईतील चाकरमान्यांनी घराकडे धाव घेण्यास सुरूवात केली. मात्र तोपर्यंत पूर्व आणि पश्चिम उपनगरपासून शहरापर्यंत वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या.
रेल्वे, रस्ते वाहतूक ठप्प झाल्याने कसे घरी जावे? या संभ्रमात मुंबईकर मिळेल ते वाहन पकडत होते. सर्वच रस्त्यांवर कंबरेएवढे पाणी साचल्याने बेस्ट बस अडकून पडल्या होत्या. याउलट पेट्रोल पंपांच्या टाकीत पाणी शिरू लागल्याने चेंबूर येथील भारत पेट्रोलियमचा पंप बंद केला होता. अशीच परिस्थिती मुंबईतील काही पंपांवर होती. पावसाचा जोर पाहून अखेर प्रशासनाने दुपारच्या सुमारास मुंबापुरीतील सर्व कार्यालय, शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर दिली.
दुपारनंतर ठिकठिकाणी मदतीसाठी राजकीय
कार्यकतेर्ही रस्त्यावर उतरले होते. परिस्थिती वाहतूक पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर गेल्याचे मुंबईकरांना दिसत होते.
महापुरापुढे पोलिस, महापालिका यंत्रणाही हतबल झाल्याचे चित्र होते. सायन- पनवेल महामार्गावरही पाणी साचले होते. २६ जुलैनंतरही पालिका प्रशासन मुसळधार संततधारेसमोर हतबल असल्याच्या टीका सोशल मीडियातून व्यक्त करण्यात आल्या.