Join us

दीर्घकालीन विश्रांतीनंतर झोडपधारेने पावसाचे दमदार पुनरागमन, जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 6:15 AM

दीर्घकालीन विश्रांतीनंतर आलेल्या पावसाने रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबईला शनिवारी झोडपून काढले.जुलै महिन्याच्या उत्तरार्धात विश्रांती घेतलेल्या पावसाने, आॅगस्टच्या उत्तरार्धात पुनरागमन केल्याने, मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

मुंबई : दीर्घकालीन विश्रांतीनंतर आलेल्या पावसाने रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबईला शनिवारी झोडपून काढले.जुलै महिन्याच्या उत्तरार्धात विश्रांती घेतलेल्या पावसाने, आॅगस्टच्या उत्तरार्धात पुनरागमन केल्याने, मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. पावसाचा हा वेग येत्या ४८ तासांसाठी कायम राहील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तविला आहे. शनिवारी सकाळपासून मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने जोर धरला. सकाळी सुरू झालेला पाऊस दुपारपर्यंत कायम होता. दुपारनंतर मात्र, पावसाने घेतलेली विश्रांती सायंकाळसह रात्रीपर्यंत कायम होती.शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला पावसाचा जोर वाढत गेल्याने, पनवेलसह रायगड जिल्ह्यातील अनेक भागांत पाणी साचले. सायन-पनवेल महामार्गावर खारघर टोल प्लाझा, कळंबोलीजवळील दोन लेन पाण्याखाली गेल्याने वाहतूककोंडी झाली होती. पनवेल तालुक्यातील बारपाडा गावात डोंगर खचल्याने एका घराचे नुकसान झाले, तर गावातील अन्य घरांनाही धोका निर्माण झाला आहे. डोलघर गावाचासंपर्क तुटल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागांत शनिवारी दिवसभर मुसळधार पाऊस पडला. यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. सकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे लोकलसेवेवरही परिणाम झाला.माळीणसारखी घटना घडू शकतेमाळीण गाव मुसळधार पावसामुळे रातोरात नष्ट झाले होते. पनवेल तालुक्यातील बारवाडा गावात डोंगर खचल्याने तशाच प्रकारची घटना घडू शकते. गावात डोंगरालगत ३० ते ४० घरे आहेत. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास या ठिकाणी माळीणची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही. तत्पूर्वी प्रशासनाने योग्य उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.इशारा : २० आॅगस्ट : कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.