Mumbai Rain : मुंबई-ठाण्यात पावसाची दमदार हजेरी; नागरिकांची उडाली तारांबळ! 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 07:24 PM2019-11-01T19:24:00+5:302019-11-01T19:27:24+5:30

अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. 

Rains to lash Mumbai, Thane and parts of Maharashtra | Mumbai Rain : मुंबई-ठाण्यात पावसाची दमदार हजेरी; नागरिकांची उडाली तारांबळ! 

Mumbai Rain : मुंबई-ठाण्यात पावसाची दमदार हजेरी; नागरिकांची उडाली तारांबळ! 

Next
ठळक मुद्देचक्रीवादळाचा प्रभाव ४ नोव्हेंबरपर्यंत‘बुलबुल’ या चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यताएकाच वेळी दोन चक्रीवादळे ही ऐतिहासिक घटना

मुंबई : गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. अंधेरी, घाटकोपर, विक्रोळीसह उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. 

शुक्रवारी दुपारी मुंबईत ढगाळ वातावरण होते. त्यानंतर सायंकाळी चारच्या सुमारास वरळी, दादर परिसरात पावसाला सुरुवात झाली. ठाणे, कल्याण परिसरातही आज दुपारी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दुपारनंतर भांडुप, मुलुंड, कल्याण परिसरासह ठाण्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. 

मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने मुंबईसह रायगड, कोकण भागात पावसाची दाट शक्यता वर्तवलेली होती. ठाणे, पालघर आणि रायगडच्या पट्ट्यात तर ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, लक्षद्वीप आणि लगतच्या दक्षिण-पूर्व अरबी समुद्रावर ‘महा’, तर पश्चिम-मध्य अरबी समुद्रावर ‘क्यार’ हे चक्रीवादळ आहे. या चक्रीवादळांमुळे किनारपट्टीवरील भागात पाऊस होत आहे. दक्षिण कोकण आणि गोवा येथे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला आहे. कोकण, गोव्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले. कोकण, गोवा, विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. 

विदर्भाच्या काही भागात व मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. कोकण, गोवा, मराठवाड्यात काही भागात तर विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.

चक्रीवादळाचा प्रभाव ४ नोव्हेंबरपर्यंत
‘महा’ हे चक्रीवादळ लक्षद्वीप क्षेत्र व नजीकच्या दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात सक्रिय झाले आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव ४ नोव्हेंबरपर्यंत राहील. हे चक्रीवादळ उत्तर-उत्तरपश्चिम दिशेने ताशी २२ किलोमीटर या वेगाने पुढे सरकत आहे. परिणामी, खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मासेमारी नौकांना परत बंदरात तत्काळ बोलाविण्यात येत आहे.

‘बुलबुल’ या चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात १ नोव्हेंबरपर्यंत हलका ते मध्यम पाऊस सुरूच राहील. पुणे शहरात शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस गडगडाटासह विखुरलेला पाऊस राहण्याची शक्यता आहे. चक्रीवादळांमुळे राज्यात आॅक्टोबरमध्ये असामान्य पाऊस पडला आहे. तर, पश्चिम बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र पुढील चार ते पाच दिवसांत निर्माण होण्याची शक्यता आहे. पुढे त्याचे ‘बुलबुल’ या चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे.

एकाच वेळी दोन चक्रीवादळे ही ऐतिहासिक घटना
अरबी समुद्रात एकाचवेळी उठलेली ‘क्यार’, ‘महा’ ही दोन चक्रीवादळे म्हणजे ऐतिहासिक घटनाच असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. त्यांनी चक्रीवादळासंदर्भात गेल्या १२५ वर्षांची माहिती तपासली असून, १२५ वर्षांत अशी कोणतीच घटना घडली नसून तशी नोंद नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Web Title: Rains to lash Mumbai, Thane and parts of Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.