Join us

पावसाचा जिल्ह्यात कहर

By admin | Published: July 30, 2014 11:35 PM

जिल्ह्यातील बहुतेक भागांतील शेती पाण्याखाली गेली आहे़ मोडक सागर, कवडास, धामणी ही तिन्ही धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत़

टीम लोकमत, ठाणे रविवारपासून कोळसत असलेल्या मुसळधार पावसाचा कहर बुधवारीही कायम होता़ उल्हास, काळू नद्यांच्या पुराचे पाणी कल्याण, उल्हासनगर, बदलापूर, म्हारळ, टिटवाळा आदी नागरी वस्त्यांमध्ये घुसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले. याशिवाय भातसा, शाई, काळू, पिंजाळ, वैतरणा, सूर्या आदी नद्यांना पूर आल्यामुळे ठिकठिकाणचे पूल पाण्याखाली गेल्यामुळे १३५ हून अधिक गावांचा शहरांशी संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातील बहुतेक भागांतील शेती पाण्याखाली गेली आहे़ मोडक सागर, कवडास, धामणी ही तिन्ही धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत़ पुराच्या पाण्यात वसई तालुक्यातील भाताणे येथील १५ लोकांसह ओस येथील १६, म्हाड येथील चार व्यक्ती अडकल्या असता त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. विक्रमगडमध्ये एक वृद्ध बुडाल्याचे वृत्त आहे़ संततधार पावसामुळे नद्यांच्या पुराच्या पाण्यात वाढ होत असल्यामुळे नदीकाठावरील शहापूर तालुक्यातील दोन गावे, वाडा तालुक्यातील २९ गावे, उल्हास नदीकाठावरील गावपाड्यांना सतर्कतेचा इशारा जिल्हाधिकारी कार्यालयाने दिला आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोठेही जीवितहानी झाली नसल्याचे जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाने स्पष्ट केले.खाडीला भरती असल्यामुळे पुराचे पाणी वाहून जाण्याऐवजी ठिकठिकाणी तुंबल्यामुळे नागरिकांचे हाल झाले. जिल्ह्यात मागील २४ तासांत २३५०.१० मिमी विक्रमी पाऊस पडला असून सरासरी १५६.६७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत १८६८९.६० पाऊस झाला असून सरासरी १२४५.९७ मिमी पाऊस झाला आहे. मागील वर्षी आजच्या दिवसापर्यंत २९७१७.३४ मिमी पाऊस झाला असता सरासरी १९८१.१६ मिमी पाऊस तत्कालीन झाला होता. बुधवारी सर्वाधिक पाऊस विक्रमगड तालुक्यात २३५ मिमी पडला असून, याखालोखाल मुरबाड, अंबरनाथ, कल्याण तालुक्यांत पडला आहे. सर्वात कमी पाऊस पालघर तालुक्यात ४६.३० मिमी पडला आहे.