पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटली; दरामध्ये प्रचंड वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:06 AM2021-07-30T04:06:27+5:302021-07-30T04:06:27+5:30
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडला असून त्याचा परिणाम भाजी वाहतुकीवर झाला आहे. भाजीपाल्याची आवक ...
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडला असून त्याचा परिणाम भाजी वाहतुकीवर झाला आहे. भाजीपाल्याची आवक घटल्याने भाजीपाला दरात वाढ झाली आहे. तसेच तेलाच्या दरातही ५ ते १० रुपयांची वाढ झाली आहे.
मुंबईत राज्यातील विविध जिल्ह्यांतून भाजीपाल्याचा पुरवठा करण्यात येतो. यामध्ये सातारा, पुणे, सांगली कोल्हापूर येथून जास्त प्रमाणात भाजीपाला येतो. परंतु काही दिवसांपूर्वी या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे भागातील भाजीपाल्याचे आणि पिकाचे नुकसान झाले आहे. या भागातून येणाऱ्या भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्याचा परिणाम मुंबईकरांच्या खिशावर होत असून भाजी महाग झाली आहे.
चेंबूर येथील भाजी विक्रेता अंकुश काटे यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे भाजीपाल्याच्या गाड्या येत नसून भाजीपाला कमी येत असल्याने दर वाढले आहेत. परंतु भाजीपाल्याची आवक घटली आहे. जर भाजीपाल्याचा पुरवठा आणखी काही दिवसात सुरळीत झाला नाही, तर भाजीपाल्याचे दर आणखी वाढू शकतात.
भाजीपाल्याचे उत्पादन वाढल्याने काही दिवसात भाजीपाला दरात घट झाली होती. पण पावसामुळे भाजीपाल्याच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. भाजीपाल्याची आवक घटल्याने भाजीपाला दरात वाढ झाली आहे.
- अमित शिंदे, भाजी विक्रेते
लॉकडाऊन काळात भाजीपाला महाग झाला होता. मात्र गेल्या काही दिवसात तो स्वस्त झाला होता. पण आठवड्याभरात पाऊस वाढल्याने भाजीपाला कमी येत असून प्रत्येक भाजीच्या दरात किलोमागे १५ ते २० रुपयांची वाढ झाली आहे.
- शीतल काळे, ग्राहक
भाजी आताचे दर पूर्वीचे दर
टोमॅटो ४० ते ६० /२० ते ३०
मिरची ६० ते ८०/ ४० ते ६०
ढोबळी मिरची ३० ते ४० / २० ते ३०
वांगी ६० ते ७०/४० ते ५०
भेंडी ६० ते ८० ते ५० ते ६०
पालक १५ ते २०/१० ते १५
मेथी २० ते ३० /१५ ते २०
शेपू २० ते ३०/ १५ ते २०