४ सप्टेंबरपासून पुन्हा एकदा राज्यात पावसाचे पुनरागमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:05 AM2021-09-03T04:05:19+5:302021-09-03T04:05:19+5:30
मुंबई : बंगालच्या उपसागरात तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र व त्याच्या आतल्या भागातील प्रवासाच्या शक्यतेमुळे येत्या ४ ते ६ ...
मुंबई : बंगालच्या उपसागरात तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र व त्याच्या आतल्या भागातील प्रवासाच्या शक्यतेमुळे येत्या ४ ते ६ सप्टेंबर दरम्यान पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता आहे. एकंदर संपूर्ण राज्यात याचा प्रभाव असण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान शास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.
३ सप्टेंबर रोजी बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. ४ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. ५ सप्टेंबर रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद, अहमदनगर, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, जालना, परभणी, लातूर, हिंगोली आणि नांदेडसह गडचिरोली जिल्ह्यांत काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी विजांचा कडकडाट होईल. ६ सप्टेंबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, लातूर, परभणी, जालना, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल.