पावसाच्या पाण्याचा निचरा होणार

By admin | Published: June 25, 2017 03:42 AM2017-06-25T03:42:58+5:302017-06-25T03:42:58+5:30

नालेसफाई आणि रस्ते कामांसह पावसाळी कामांना विलंब होत असल्याच्या कारणात्सव, लोकप्रतिनिधींनी महापालिका प्रशासनावर टीकेची झोड उठविली होती

Rainwater drainage will occur | पावसाच्या पाण्याचा निचरा होणार

पावसाच्या पाण्याचा निचरा होणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नालेसफाई आणि रस्ते कामांसह पावसाळी कामांना विलंब होत असल्याच्या कारणात्सव, लोकप्रतिनिधींनी महापालिका प्रशासनावर टीकेची झोड उठविली होती. बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत स्थायी समिती सदस्यांनी पंपिंग स्टेशनच्या मुद्द्यांवरून प्रशासनाला घेरले होते. या वेळी निरुत्तर असलेल्या प्रशासनाने नंतर मात्र कार्यवाही सुरू केली असून, शनिवारी गजदरबंध उदंचन केंद्रातील दोन पंपांची ऐन भरतीदरम्यान यशस्वी चाचणी करण्यात आली आहे, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. महत्त्वाचे म्हणजे, या उदंचन केंद्राचा फायदा पश्चिम उपनगराला होणार असून, विलेपार्ले, खार, सांताक्रुझ आणि वांद्रे येथील पावसाचे पाणी निचरा होण्यास मदत होणार आहे.
मुंबई महापालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गजदरबंध उदंचन केंद्रातील दोन पंपांची शनिवारी ऐन भरतीच्या वेळी यशस्वी चाचणी घेण्यात आली. शनिवारी भरतीच्या लाटा ४.८९ मीटर असताना ही चाचणी घेण्यात आली. या प्रसंगी पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे प्रमुख अभियंता लक्ष्मण व्हटकर आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. रविवारपासून हे उदंचन केंद्र सेवेत येणार आहे. या उदंचन केंद्रामुळे एच/पश्चिम व के/पश्चिम या विभागाच्या क्षेत्रात पावसाळ्यादरम्यान साचू शकणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यास मदत होणार आहे. परिणामी, विलेपार्ले, सांताक्रुझ, खार आणि वांद्रे परिसरालाही याचा फायदा होणार आहे, असा दावा महापालिकेने केला आहे.
मुंबापुरीत मुसळधार पाऊस पडला की, पहिल्यांदा हिंदमाता आणि माटुंगा येथील गांधी मार्केट हा परिसर जलमय होतो. येथील पाण्याचा उपसा करण्यासाठी महापालिकेला मोठ्या प्रमाणावर पंपांची मदत घ्यावी लागते. मागील कित्येक वर्षांपासून हा प्रश्न निकाली लागलेला नाही. महत्त्वाचे म्हणजे, येथील पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेने १०० कोटी रुपये खर्च केले असून, ब्रिटानिया पंपिंग स्टेशनची उभारणी केली आहे. तरीही पाण्याचा निचरा त्वरित होण्याचा मार्ग मोकळा झालेला नाही, तर दुसरीकडे या वर्षीच्या पावसाळ्यात मुंबईत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ नये आणि स्थिती सुधारावी, यासाठी मुंबई महापालिकेने तब्बल ३१३ ठिकाणी पाणीउपसा करणारे पंप बसविण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, हे पंप मुंबईकरांना दिलासा देतील की नाही? हे मात्र येणार काळच ठरविणार आहे.
भायखळा, चिंचपोकळी, वरळी, दादर हिंदमाता, माटुंगा गांधी मार्केटसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील सखल भागात तुंबणारे पावसाचे पाणी गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबईकरांना लेटमार्क लावत आहेत. लाल बहादूर शास्त्री मार्गावरील कुर्ला डेपो, कमानी सिग्नल येथील पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने येथील वाहतूककोंडीची समस्या जैसे थे आहे. विशेषत: येथील शीतल सिग्नल परिसरात गुडघ्याएवढे पावसाचे पाणी साचत असून, ते निचरा होण्यास मोठ्या प्रमाणावर अडथळा येत असल्याची माहिती स्थानिक रहिवासी राकेश पाटील यांनी दिली आहे. विद्याविहार बस स्थानक परिसर, पश्चिम उपनगरात मिलन सब वे, अंधेरी पूर्वेकडील मरोळ परिसरासह उर्वरित ठिकाणांवरील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याचा प्रश्न कधी सुटणार? या प्रश्नाचे उत्तर अद्यापही पालिकेकडे नसल्याचे चित्र आहे.

Web Title: Rainwater drainage will occur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.