मुंबई : घोटाळ्यामुळे वादग्रस्त ठरलेल्या रस्ते विभागाला गेल्या आर्थिक वर्षात कमी निधी मिळाला. त्यामुळे हे आर्थिक वर्ष संपण्यास जेमतेम दोन महिने उरले असताना, अद्याप रस्त्यांची निम्म्यांहून अधिक कामे खोळंबलेलीच आहेत. नियोजित ६०० रस्त्यांपैकी ५४१ रस्त्यांची कामे अद्याप सुरूही झालेली नाहीत. त्यामुळे या वर्षी पावसाळ्यात रस्त्यांचे खोदकाम मुंबईकरांची डोकेदुखी वाढवणार आहे.दरवर्षी रस्ते विभागासाठी अर्थसंकल्पात सरासरी अडीच हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येते. सन २०१६-२०१७ या आर्थिक वर्षात रस्त्यांच्या विकासासाठी २ हजार ८८६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, रस्ते विभागातील घोटाळा उघड झाल्यानंतर, सन २०१७-२०१८मध्ये केवळ एक हजार ९५ कोटी रस्ते कामांसाठी राखून ठेवण्यात आले, तसेच रस्त्यांच्या पुनर्बांधणीऐवजी पृष्ठभागावरील थर काढून, त्यावर पुन्हा डांबराचा थर चढवून रस्त्यांचे काम करण्याचा निर्णय पालिकेने घेतला.रस्त्यांची कामे ‘प्रकल्प आणि प्राधान्य’ यामध्ये विभागून, एकूण १ हजार ७८५ कामे पालिकेने निश्चित केली आहेत. गेल्या वर्षभरात यापैकी ६६४ रस्त्यांची कामे झाल्याचा दावा पालिका प्रशासन करीत आहे, तर ६०० रस्त्यांची कामे सुरू असून, ५४१ कामे अद्याप निविदा प्रक्रियेत रखडली आहेत. प्राधान्य-२ मधील ९३८ कामांपैकी काही रस्त्यांची कामे प्रशासनाने सर्वेक्षणानंतर वगळली आहेत, तर काही कामांचा समावेश प्रकल्पांमध्ये करण्यात आल्याने रस्त्यांची संख्या कमी झाली आहे.च्मुंबईतील ६९ चौकांचे काम पालिकेने हाती घेतले आहे. मास्टर अस्फाल्टने या चौकांचा विकास होणार आहे. यापैकी २७ चौकांचे काम सुरू होणार होते. मात्र, यापैकी हाती घेण्यात आलेल्या २१ चौकांचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही.च्काही महिन्यांपूर्वी खडीचा पुरवठा होत नव्हता, म्हणून रस्त्यांची कामे रखडली होती. या आर्थिक वर्षात १६ सिमेंट काँक्रीट तर २१६ डांबरी रस्ते कामांसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर या कामाला सुरुवात होणार आहे.५४१ रस्त्यांच्या कामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, त्याचे प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी मांडण्यात येतील. तेथे मंजुरी मिळाल्यानंतर या कामांना सुरुवात होईल.'च्रस्ते पुनर्बांधणीसाठी प्रती चौ. मी. ३ हजार ५०० ते ४ हजार ५०० रुपये खर्च येतो, तर खराब रस्त्यांच्या पृष्ठभागाचा थर काढून विकास केल्यास त्याच्या प्रती चौ. मी. १हजार ३७० ते २ हजार ८०० एवढा खर्च येतो.प्राधान्य-२ मध्ये ९३८ रस्ते, १६३ सिमेंट काँक्रीट आणि ६९१ डांबरी रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. या आर्थिक वर्षात १५ कि. मी. लांबीच्या २५ सिमेंट काँक्रीटचे रस्ते हाती घेण्यात आले आहेत. यासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, तर १२५ कि. मी. लांबीच्या २१६ रस्त्यांसाठी ५८२ कोटींची तरतूद मंजूर करण्यात आली आहे.
पावसाळ्यातली खोदकामे डोकेदुखी वाढवणार? रस्त्यांची निम्म्याहून कामे रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 7:19 AM