१५४ पंप उपसणार पावसाचे साचलेले पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 06:32 AM2019-05-10T06:32:25+5:302019-05-10T06:32:41+5:30
पश्चिम रेल्वे मार्गावरील मरिन लाइन्स, मुंबई सेंट्रल, दादर, माटुंगा रोड, माहिम, वांद्रे, अंधेरी, बोरीवली, नालासोपारा, विरार या भागांत मागील वर्षी जास्त प्रमाणात पाणी साचण्याच्या घटना घडल्याने या वर्षी या ठिकाणी १५४ पंप मशीन बसविण्यात येणार आहेत.
मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील मरिन लाइन्स, मुंबई सेंट्रल, दादर, माटुंगा रोड, माहिम, वांद्रे, अंधेरी, बोरीवली, नालासोपारा, विरार या भागांत मागील वर्षी जास्त प्रमाणात पाणी साचण्याच्या घटना घडल्याने या वर्षी या ठिकाणी १५४ पंप मशीन बसविण्यात येणार आहेत.
पश्चिम रेल्वेद्वारे चर्चगेट ते विरारमधील नाल्यांची सफाई ६० टक्के पूर्ण झाली आहे. यासह नाल्यांची खोली करण्याचे काम सुरू आहे. रेल्वे रुळावरून पाणी वाहून जाण्यासाठी रेल्वे रूळ मार्गाच्या किनारी भागाला उतार देण्यात आला आहे. आतापर्यंत सुमारे १ लाख ६० हजार क्युबिक मीटर चिखल, माती, रेती बाहेर काढून विशेष लोकलद्वारे हा घनकचरा या परिसरातून बाहेर नेला आहे.
रेल्वे हद्दीतील कमकुवत फांद्यांची आणि झाडांची छाटणी केली जाणार आहे. पश्चिम रेल्वेद्वारे लोकलमधील खिडकी आणि दरवाजे यांची तपासणी करून खिडकी आणि दरवाज्यांना दुरुस्त करण्यात येणार आहे. छत आणि पन्हाळी यांची देखभाल करण्यात येणार आहे.
सिग्नल यंत्रणा आणि ओव्हर हेड वायरची दुरुस्तीचे कामे हाती घेण्यात आली आहेत. मान्सूनवेळी रेल्वे कर्मचाऱ्यांना गमबूट, रेनकोट देण्यात येणार आहेत. यासह अन्य सामग्रीची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जोरदार पाऊस पडण्याच्या वेळी अधिकारी वर्ग २४ तास रेल्वे मार्गावर लक्ष ठेवणार आहे.
उद्घोषणेद्वारे गर्दीचे व्यवस्थापन
पावसाचे पाणी भरल्याने गर्दीचे प्रमाण एका ठिकाणी वाढते. त्यामुळे एका ठिकाणी जास्त गर्दी झाल्यास उद्घोषणेद्वारे गर्दी कमी करण्याची घोषणा केली जाणार आहे. यासह सीसीटीव्हींद्वारे गर्दीच्या ठिकाणांवर लक्ष ठेवले जाणार आहे. रेल्वे स्टॉलवर खाद्यपदार्थांच्या वस्तू जास्त प्रमाणात ठेवण्यात येणार आहेत.
कोकण रेल्वेही सज्ज
कोकण रेल्वे प्रशासनाने मान्सूनपूर्व उपाययोजना सुरू केल्या आहेत. बोगद्यामध्ये किंवा इतर खडकाळ भागात दरड कोसळण्याच्या घटना घडतात. मात्र अशा आपत्कालीन ठिकाणी जाळी लावण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे, असे कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी एल. के. वर्मा यांनी सांगितले.