Join us  

रेन वॉटर हार्वेस्टिंगचा बोजवारा

By admin | Published: May 24, 2014 1:10 AM

पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासू नये, यासाठी ठाणे शहरात वर्षा जलसंचय व विनियोग (रेन हार्वेस्टिंग) योजना विकासकांवर बंधनकारक केली आहे.

नामदेव पाषाणकर, घोडबंदर - पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासू नये, यासाठी ठाणे शहरात वर्षा जलसंचय व विनियोग (रेन हार्वेस्टिंग) योजना विकासकांवर बंधनकारक केली आहे. ती ३०० स्क्वेअर मीटरच्या पुढील क्षेत्राच्या विकासासाठी असल्यामुळे २००९ पासून २०१३-१४ च्या आर्थिक वर्षापर्यंत ७२५ विकासकांनी ती कार्यान्वित केली आहे. मात्र, वापर परवाना घेतल्यानंतर ती योजना सुरू आहे की बंद आहे, याचा लेखाजोखा पाणी खाते किंवा शहर विकास विभागाकडे दिसत नसल्यामुळे तिचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. रेन हार्वेस्टिंगसंदर्भात १८ जानेवारी २००५ रोजी ठराव मंजूर करण्यात आला होता. पिण्याच्या पाण्याचा गैरवापर होऊ नये, भूजलाची परिस्थिती सुधारावी, यासाठी संकुलांमध्ये बोअरवेल व वर्षा जलसंचय करणे बंधनकारक करण्यात आले होते. या पाण्याचा वापर मलनि:सारण व्यवस्था, बगिचा, गाड्या धुणे, यासाठी करण्याचा उद्देश होता. ती राबवली तरच शहर विकास विभागाकडून सदर संकुलाला वापर परवाना देण्यात येतो. योजना सुस्थितीत न ठेवल्यास नळजोडणी खंडित करण्याचा महापालिकेला अधिकार आहे. असे असताना वापर परवाना घेतल्यानंतर ती सुरू आहे की नाही, याची खातरजमा करण्याचे कुठचेही नियोजन दिसत नाही. यासाठी ना-हरकत दाखला देताना पाणी खात्याचे अधिकारी तपासणी करताना शहर विकास विभागाचे अधिकारीही योजना पूर्ण केल्याचा अहवाल घेऊनच विकासकाला वापर परवाना देत असतात. ती केली नसल्यास किंवा सुस्थितीत नसल्यास १०० स्क्वेअर मीटरसाठी एक हजार रुपये दंड घेण्याचे अधिकारदेखील मनपाला आहेत. मुळात शहर विकास आणि पाणी खात्यात समन्वय नसल्यामुळे योजनेला बहुतेक ठिकाणी हरताळ फासला जात आहे.