मुंबईः मुलुंड येथील जलवर्धिनी प्रतिष्ठान जलसाठवणुकीबाबत व्याख्यान व माहिती तर देतेच, पण प्रत्यक्ष जागेवर टाक्याही बांधून देते. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसोबत मराठवाड्यातील अनेक ठिकाणी या संस्थेने पाणी साठविण्याच्या टाक्या उभारण्याचे काम केले असून, यासाठी संस्थेचे संस्थापक उल्हास परांजपे दशकभराहून अधिक काळ कार्यरत आहेत.राज्यात सरासरी पावसाचे प्रमाणे हे ५०० ते ४ हजार मिलिमीटर आहे. विविध प्रकारे पावसाचे पाणी साठवून ठेवले तर त्याचा वापर वर्षभर करता येणे शक्य आहे. यासाठीच जलवर्धिनी प्रतिष्ठानच्या उल्हास परांजपे यांनी व्यावहारिक उपक्रम सुरू केला. यास एका अर्थाने लोकोपयोगी चळवळ म्हणता येईल. एक एकर शेतजमिनीवर साधारणपणे २० लाख लिटर पावसाचे पाणी पडते. मुळात एवढे पाणी शेतीसाठी लागत नाही. परिणामी त्यापैकी काही पाणी साठवता आले तर? यासाठी उल्हास परांजपे यांनी अभ्यास सुरू केला. यातूनच एक एकर जमिनीपैकी दहा टक्के भागात साठवण टाकी उभारल्यास वर्षभर त्यातील पाण्याचा वापर करता येईल, हे लक्षात आले. यातून रायगड व कर्जत तालुक्यात साठवण टाक्या बांधण्यात आल्या. २००१ साली जलवर्धिनीने कामाची रूपरेखा तयार केली. २००३ पासून कर्जत तालुक्यात काम सुरू केले. कुंडापैकी एक कोकण कुंड बांधायचे झाल्यास प्लास्टिकचे कापड वापरून ही टाकी बांधता येते. भाताचा पेंढा वापरून केलेले झाकण लावल्यास जलकुंड झाकल्यामुळे बाष्पीभवन होत नाही. त्यासाठी अंदाजे तीन हजार रुपये एवढा खर्च येतो. या जलकुंडात चार हजार लिटर पाणी साठवता येते.अनेक ठिकाणी कार्यशाळा घेऊन पाणी साठविण्याबाबत त्यांनी जनजागृती केली आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावागावात साठवण टाक्या बांधून देण्याचा उपक्रम राबिवला आहे. गेल्या दशकात त्यांनी शेकडो साठवण टाक्या शेतांमध्ये उभारून दिल्या. यासाठी तांत्रिक मदत, मार्गदशन ते मोफत करतातच. ज्या ठिकाणी आवश्यकता असेल तेथे आर्थिक मदतही प्रतिष्ठानच्या माध्यमातून केली जाते................................उल्हास परांजपे हे जलवर्धिनी प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक. अंधेरी येथील सरदार पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात ते प्राध्यापकी करत होते. २००३ पासून जलवर्धिनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून पाणी साठवणीचे साधे, सोपे पर्याय सुचवून त्याची अंमलबजावणी करण्याचे काम ते करत आहेत................................वांगणी, कर्जत, विक्रमगड, डहाणू, तलासरी, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच मराठवाड्या प्रतिष्ठानने पर्जन्य जल साठविण्याच्या टाक्या बांधल्या आहेत. या टाक्या म्हणजे धरणांच्या छोटया प्रतिकृती आहेत................................बारा वर्षांत प्रतिष्ठानने १६० टाक्या बांधल्या आहेत. एक हजार लिटर्स ते २० हजार लिटर्स क्षमतेच्या या टाक्या आहेत. व्यक्तिगत पातळीवर पाणी वापर करण्यासाठी त्या उपयुक्त ठरत आहेत. शासकीय अनुदान न घेता खासगी स्तरावर हा उपक्रम राबविला जात आहे.
साठवण पावसाच्या पाण्याची, जलवर्धिनी प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2019 3:34 PM