Join us

पावसाचे पाणी चाळींसह इमारतीमध्ये शिरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2020 15:58 IST

रहिवाशांचे झाले मोठे आर्थिक नुकसान

ठळक मुद्दे८ ठिकाणी बांधकामांचा भाग कोसळला.१२ ठिकाणी झाडे कोसळली.४० ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या.

ताडदेव पोलीस ठाण्याच्या मागे दरडीचा भाग कोसळला

मुंबई : मंगळवार रात्रीसह बुधवारी दिवसभर लागून राहिलेल्या जोरदार ते मध्यम स्वरुपाच्या पावसाने मुंबईकरांना जोरदार दणका दिला. विशेषत: दक्षिण आणि मध्य मुंबईतील बहुतांशी विशेषत: बीडीडी चाळीतील तळमजल्यांवरील घरांत पावसाचे पाणी शिरल्याने रहिवाशांचे मोठे नुकसान झाले आहे. वरळी, लोअर पर येथील चाळींमध्ये मोठया प्रमाणावर पावसाचे पाणी शिरले असतानाच पूर्व व पश्चिम उपनगरातील इमारतींच्या तळमजल्यावर वास्तव्यास असलेल्या रहिवाशांनाही देखील पूरसदृश्य पाण्याचा सामना करावा लागला. बुधवारची संध्याकाळ उजाडली तरीदेखील पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता. त्यामुळे दिवसभर लागून राहिलेल्या पावसाने मुंबईकरांना धडकीच भरविली होती.

एकीकडे कोरोना तर दुसरीकडे पाऊस; अशा दुहेरी संकटात मुंबईकर सापडला आहे. मंगळवारी रात्री सुरु झालेल्या पावसाने आपला मारा कायम ठेवल्याने बुधवारी दिवसभर पाऊस कोसळत होता. दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, पूर्व आणि पश्चिम उपनगरात जोरदार ते मध्यम स्वरुपात कोसळलेल्या पावसामुळे पाण्याचा निचरा देखील होत नव्हता. विशेषत: ग्रँटरोड येथील स्टेशन लगतची वस्ती, मुंबई सेंट्रल येथील परिसरत, वरळी येथील महापालिका कर्मचा-यांची वस्ती, चिंचपोकळी परिसरात साठलेल्या पावसाच्या पाण्याने रौद्र स्वरुप धारण केले होते. रस्त्यांवर साचलेल्या पाण्यात चारचाकी वाहनांसह दुचाकी वाहने अर्धी बुडाली होती. तळमजल्यावरील बहुतांशी रहिवाशांच्या घरात पाणी शिरले होते. त्यामुळे अबाल वृध्दांची दैंना उडाली होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील हिंदमाता आणि गांधी मार्केट परिसरात तुंबलेल्या पावसाच्या पाण्याने तर हा मार्गच बंद झाला होता. येथून प्रवास करणारी वाहने अर्धिधीक पाण्याखाली जात होती. लाल बहादूर शास्त्री मार्गावर कुर्ला डेपो, कल्पना सिनेमा, शीतल सिग्नल आणि कमानी जंक्शन येथे गुडघ्यावर साचलेल्या पाण्यातून वाहने आणि चाकरमानी वाट काढत होते. या पाण्याचा लवकर निचरा होत नसल्याने हेच पाणी लगतच्या वस्त्यांमध्ये शिरत होते. आणि रहिवासी वस्त्यांना याचा मोठा फटका बसत असल्याचे चित्र होते. सकाळी पावसाचा जोर कमी झाल्याने येथील पाण्याचा ब-यापैकी निचरा झाला होता. मात्र दुपारी पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला. आणि पुन्हा याच परिसरात पाणी साचते की काय? याची धडकी मुंबईकरांना लागून राहिली.

चिंचपोकळी येथे रस्त्यांवर, सायन परिसरात गुडघ्या एवढे, सायनमध्ये किंग्ज सर्कलमध्ये पाणी साचले होते. मुंबई सेंट्रल येथील आगारात पाणी साचले होते. येथे गेल्या ३५ वर्षांत एवढे पाणी कधी साचले नव्हते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. लोअर परळ येथील बीडीडी चाळ, वरळी येथील डिलाईल रोड परिसर, शिवडी बीडीडी चाळ परिसर, महालक्ष्मीमधील वस्तीलगत आणि ग्रँटरोड रेल्वे स्थानकाच्या परिसरात मोठया प्रमाणावर पाणी साचले होते. रेल्वे स्थानकांचा विचार करता दुसरीकडे मस्जिद बंदर रेल्वे स्थानकात पाणी साचले होते. येथे बच्चे कपंनी पावसात भिजत आनंद लुटत होती कुर्ला रेल्वे स्थानक, सायन रेल्वे स्थानक परिसरात देखील फार काही वेगळी परिस्थिती नव्हती.

 

टॅग्स :पाऊसमुंबई मान्सून अपडेटहवामानमुंबई