पावसाचे पाणी भूमिगत टाक्यांमध्ये साठवले जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:04 AM2021-07-05T04:04:27+5:302021-07-05T04:04:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : हिंदमाता परिसरात साचणारे पावसाचे पाणी पंपांच्या सहाय्याने आणून सेंट झेवियर्स मैदान आणि प्रमोद महाजन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : हिंदमाता परिसरात साचणारे पावसाचे पाणी पंपांच्या सहाय्याने आणून सेंट झेवियर्स मैदान आणि प्रमोद महाजन उद्यान याठिकाणी बांधण्यात येणाऱ्या भूमिगत टाक्यांमध्ये साठवले जाणार आहे. त्यामुळे हिंदमाता परिसरात पावसाचे पाणी साचण्याची समस्या कायमची दूर होण्यास मदत होणार आहे.
हिंदमाता परिसरातील पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येत असलेल्या कामांची पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी रविवारी दुपारी हिंदमाता, सेंट झेवियर्स मैदान आणि प्रमोद महाजन उद्यान येथे भेट देऊन पाहणी केली. या कामांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करतानाच ही कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिल्या.
मुंबईची भौगोलिक स्थिती आणि पावसाची अनिश्चितता लक्षात घेता मुसळधार पावसात आणि त्यावेळी समुद्राला भरती असल्यास प्रसंगी सखल भागात पावसाचे पाणी साचून समस्या निर्माण होते. यावर मुंबई महापालिकेकडून उपाय योजले जात आहेत. कलापार्कच्या सुशोभिकरण व विकासकामासंदर्भात आराखड्याचे ठाकरे यांच्यासमोर सादरीकरणदेखील यावेळी करण्यात आले.