Join us

पावसाच्या पाण्याचा निचरा जलद गतीने होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पावसाच्या पाण्याचा निचरा जलद गतीने होण्यासाठी मनपा ५८ कामे हाती घेणार असून, यासाठी साधारणपणे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पावसाच्या पाण्याचा निचरा जलद गतीने होण्यासाठी मनपा ५८ कामे हाती घेणार असून, यासाठी साधारणपणे १९० कोटी एवढा खर्च अपेक्षित आहे. ही कामे लवकरच हाती घेण्यात येत असून यापैकी बहुतांश कामे येत्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर संबंधित परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक जलद गतीने होऊन परिसरातील नागरिकांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.

पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे, पंपिंग क्षमता, पाणलोट क्षेत्र, पर्जन्यवृष्टीचा अहवाल, भरती-ओहोटी या मुद्द्यांचा अभ्यास पर्जन्य जलवाहिन्या खात्याद्वारे करण्यात आला. या आधारे उपाययोजना अंमलात आणण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. आता निविदा प्रक्रियेअंती निवड झालेल्या संस्थांना कार्यादेश देण्यासाठीची मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.

माटुंगा येथील गांधी मार्केट, सांताक्रुज (पश्चिम) परिसरातील जे. के. मेहता मार्ग, अंधेरी (पूर्व) परिसरातील कोंडीविटे नाला, अंधेरी (पूर्व) परिसरात असणाऱ्या सहार रोडनजीक असणारा नाला, चेंबूर (पश्चिम) परिसरात असणारा पी. एल. लोखंडे मार्गानजीकची ड्रेन पद्धतीची पर्जन्य जलवाहिनी, देवनार येथील गौतम नगर परिसरातील पर्जन्य जलवाहिनी, बोरिवली (पश्चिम) परिसरात असणाऱ्या चंदावरकर मार्गानजीक असणाऱ्या नाल्याचे रुंदीकरण, गोरेगांव (पश्चिम) परिसरात असणाऱ्या महेश नगर व एम. टी. एन. एल. जंक्शननजीक असणाऱ्या पिरामल नाल्याचे रुंदीकरण अशा मोठ्या कामांचा यात समावेश आहे.