खालापूर : गेले दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी चांगलाच सुखावला आहे. अख्खा जून महिना कोरडा गेल्याने शेतकरी अडचणीत आला असताना दुबार पेरणी करण्याचे संकट उभे ठाकले होते. याशिवाय पाणी टंचाई निर्माण झाली होती. पाऊस पडत नसल्याने व्यापारी वर्गात असमाधान होते मात्र सोमवारी रात्रीपासून दमदार पाऊस कोसळत असल्याने बळीराजासह नागरिकही सुखावले आहेत. अनेक वर्षानंतर जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात आला होता. जूनच्या पहिल्या आठवड्यात सर्वत्र पेरण्या पूर्ण झाल्या असताना पाऊस मात्र पडत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. पेरलेले बी उगवले खरे परंतु उगवलेल्या भात रोपांना पाणी मिळत नसल्याने रोपे करपण्यास सुरुवात झाली होती. रोपांची स्थिती अत्यंत नाजूक असताना रोपे वाचवण्यासाठी शेतकरी पाण्यासाठी वणवण करीत होता. बैलगाडी, बोरवेल, डोक्यावरून तर विकत पाणी घेवून रोपांना देत होता. पाऊस नक्की पडणार या आशेवर शेतकरी रोपांना वाचवण्यासाठी धडपड करीत होता तर दुसरीकडे पाऊस लांबणीवर गेल्याने तालुक्यातील धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्याने पाणीटंचाईसारखी गंभीर समस्या निर्माण झाली होती . पाऊस नसल्याने त्याचा परिणाम शहरांमधील बाजार पेठांवर दिसून येत होता. शेतकरी, नागरिक, व्यापारी असे सर्वच जणांचे लक्ष पावसाच्या आगमनाकडे लागले असताना अखेर जुलै महिन्याच्या सुरु वातीला पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी आनंदात आहे . गेले दोन दिवस तालुक्यातील सर्वच भागात दमदार पाऊस कोसळत आहे. धरण क्षेत्रात पाऊस झाल्याने पाणी साठा वाढला आहे.
अखेर पावसाचे दमदार आगमन
By admin | Published: July 02, 2014 10:52 PM