मुंबई : गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरात कोसळलेल्या पावसाने आणि ढगाळ वातावरणाने बुधवारी काहीशी विश्रांती घेतली. परिणामी नागरिकांना थोडीशी मोकळीक मिळाल्याचे चित्र होते. बुधवारी दिवसभर मुंबईचे आकाश मोकळे होते. शिवाय सूर्यप्रकाशदेखील लख्ख असल्याने पावसाने झोडपलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.
भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. कोकण, गोवा, विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत मात्र पावसाने बऱ्यापैकी उघडीप घेतली. गुरुवारी कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत तुरळक ठिकाणी मध्यम किंवा हलक्या पावसाची शक्यता आहे.