पावसाची रिपरिप, तरीही चैत्यभूमीवर उसळला भीमसागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 04:54 AM2017-12-06T04:54:13+5:302017-12-06T04:55:28+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर लाखो अनुयायी दाखल झाले आहेत
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर लाखो अनुयायी दाखल झाले आहेत. ओखी वादळामुळे मुंबईत पावसाची रिपरिप असली तरीही भीमसैनिक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. चैत्यभूमीला भीमसागराचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
पाऊस सुरू झाल्याने महापालिकेच्या ७० शाळांमध्ये अनुयायांची व्यवस्था करण्यात आली. येथे वैद्यकीय तपासणीची सुविधा आहे. दादर रेल्वे स्थानकावर उतरणाºया अनुयायींना विनाशुल्क बेस्ट बसद्वारे उपलब्ध शाळांमध्ये नेण्यात येत होते. महापालिकेचे २४ विभागीय नियंत्रण कक्ष सतर्क ठेवण्यात आले असून आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. वैद्यकीय सेवेच्या रुग्णवाहिका तत्पर ठेवण्यात आल्या आहेत. धारावी, माटुंगा लेबर कॅम्प, दादर, नायगाव, परेल, माहीम, खेरवाडी येथील शाळा, समाज मंदिरातही अनुयायांची व्यवस्था करण्यात आली.
महापालिकेच्या सेवा-सुविधांच्या सचित्र माहिती पुस्तिकेचे प्रकाशन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते मंगळवारी झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण सुकाणू समिती, भीमआर्मी, बीएसपी, कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्था, हिंदुस्तान पेट्रोलियम कर्मचारी संघटनेसह मी बुद्धिस्ट फाउंडेशन संस्थेनेही मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.
भीमसैनिकांची शाळांमध्ये व्यवस्था
पावसामुळे शिवाजी पार्कमध्ये चिखल झाल्याने अनुयायांना लगतच्या शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात आले. एका मंडपात कार्यक्रम सुरू असताना तो अचानक कोसळला. त्यामुळे तीन जण जखमी झाले आहेत. त्यांना सायन येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.