मुसळधार पावसात बोरीवलीतील सार्वजनिक गणेशोत्सवाचा बाप्पा गेला वाहून
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2017 06:53 PM2017-08-30T18:53:33+5:302017-08-30T19:53:48+5:30
बोरीवली, दि. 30 - मुसळधार झालेल्या पावसानं मंगळवारी (30 ऑगस्ट )मुंबईची दाणादाण उडाली. अनेकांना या पावसाचा फटका बसला. पावसामुळे ...
बोरीवली, दि. 30 - मुसळधार झालेल्या पावसानं मंगळवारी (30 ऑगस्ट )मुंबईची दाणादाण उडाली. अनेकांना या पावसाचा फटका बसला. पावसामुळे बोरीवलीतील संजय गांधी नॅशनल पार्क येथील डोंगरावरुन वाहणा-या नदीमुळे श्रीकृष्ण नगर, शांतीवन, नॅन्सी एसटी डेपो येथे रस्त्यावर सुमारे 10 फूट पाणी साचल्यानं या परिसराला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. शिवाय, श्रीकृष्ण नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपतीदेखील मंगळवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास पाण्यात वाहून गेल्याची माहिती माजी नगरसेवक भास्कर खुरसंगे यांनो दिली. बुधवारी सकाळी 9 वाजेपर्यतही तेथे पाणी तुंबलेले होते, अशी माहिती असल्याची माहिती त्यांनी दिली.
मुसळधार पावसामुळे नॅशनल पार्कमधील तलावदेखील भरल्यामुळे येथील वनरक्षकांनी तलावाचे दरवाजे उघडले होते. नॅशनल पार्कवरून वाहणारी नदी आणि रस्त्यावरून येणारे पाणी एकत्र झाल्यामुळे येथील श्रीकृष्ण नगर सभागृहाची भिंतदेखील कोसळली. शिवाय येथील गणपतीदेखील मंगळवारी संध्याकाळी वाहून गेला. दरम्यान, खार (पूर्व)मधील जवाहरनगरमध्ये पाणी तुंबल्याने बुधवारी गौरी पूजनाच्या भाविकांच्या घेतलेल्या सर्व पूजा रद्द केल्याची माहिती प्रथमेश फडके या गुरुजींनी लोकमतसोबत बोलताना दिली.