ऊन्ह-पावसाचा खेळ चालूच
By admin | Published: August 10, 2015 01:40 AM2015-08-10T01:40:25+5:302015-08-10T01:40:25+5:30
मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा धिंगाणा सुरू असतानाच मुंबईसह उपनगरात पावसाने विश्रांती घेतली आहे. मागील ७२ तासांपासून शहर आणि उपनगरात
मुंबई : मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा धिंगाणा सुरू असतानाच मुंबईसह उपनगरात पावसाने विश्रांती घेतली आहे. मागील ७२ तासांपासून शहर आणि उपनगरात ऊन्ह-पावसाचा खेळ सुरू असून, रविवारीही मुंबईकरांना अशाच काहीशा आल्हादायक हवामानाचा प्रत्यय आला. पावसाच्या अधून-मधून बरसण्यामुळे येथील पडझडीच्या घटना सुरूच असून, मुंबईत दोन ठिकाणी बांधकामाचा भाग पडल्याच्या घटना घडल्या. तर शॉर्टसर्किटच्या ५ घटनांसह १० ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या.
मध्य भारतावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर काहीसा वाढला. शिवाय कालांतराने या कमी दाबाच्या क्षेत्राचा अरबी समुद्रातील वातावरणावर प्रभाव वाढल्याने मुंबईतील पावसाने जोर पकडला. परंतु पुन्हा वातावरणातील बदलामुळे मुंबईतील पावसाचा जोर ओसरला.
परिणामी आता शहरात अधून-मधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत असून, सलग पडणाऱ्या पावसामुळे शहराच्या तापमानात घट झाली आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २८, २४ अंशाच्या घरात नोंदविण्यात येत असून, तापमानात सरासरी ४ अंशाची घट झाली
आहे.
महापालिका नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, देवनार आगाराच्या संरक्षक भिंतीलगत असलेल्या तीन मजली इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना बांधकामाचा काही भाग पडल्याची घटना घडली. तर मालाड पश्चिमेकडील नागादेवी मंदिराच्या बाजूला भोपी हाउस या बंगल्याच्या भिंतीचा काही भाग पडला. शिवाय शहरात २, पूर्व उपनगरात १ आणि पश्चिम उपनगरात २ अशा एकूण ५ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. पूर्व उपनगरात ३, पश्चिम उपनगरात ७ अशा एकूण १० ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत शहरात ११.२२, पूर्व उपनगरात ६.८७ तर पश्चिम उपनगरात १२.३८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोकणासह गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे.
पुढील ७२ तासांसाठी कोकण गोव्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (प्रतिनिधी)