पावसाचा इशारा; हवामान मात्र कोरडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 04:18 AM2018-06-28T04:18:53+5:302018-06-28T04:18:57+5:30
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून दक्षिण कोकण आणि उत्तर कोकणाला पावसाचा इशारा देण्यात येत असला, तरी प्रत्यक्षात मात्र उत्तर कोकणात मोडत असलेल्या मुंबई शहर आणि उपनगराला पावसाने हुलकावणी दिली
मुंबई : भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून दक्षिण कोकण आणि उत्तर कोकणाला पावसाचा इशारा देण्यात येत असला, तरी प्रत्यक्षात मात्र उत्तर कोकणात मोडत असलेल्या मुंबई शहर आणि उपनगराला पावसाने हुलकावणी दिली आहे. परिणामी, बदलत्या अंदाजामुळे हवामान खात्याच्या कामकाजावर होणारी टीका वाढू लागली आहे. सोमवारी बरसलेल्या दमदार पावसाने मंगळवारसह बुधवारी चांगलीच विश्रांती घेतल्याने मुंबईतील हवामानात बदल नोंदविण्यात येत आहेत. बदलत्या हवामानामुळे उन्हाचा तडाखा मुंबईकरांना बसत असून, उकाड्याने मुंबईकर घामाघूम होत आहेत.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मान्सून बुधवारी गुजरातच्या आणखी काही भागात, पूर्व राजस्थानच्या काही भागात, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओरिसा, बिहार, झारखंडच्या उर्वरित भागात, संपूर्ण मध्य प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशच्या बहुतांश भागात, संपूर्ण जम्मू-काश्मीर, पंजाबच्या काही भागात दाखल झाला आहे. गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.
२८ जून रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. २९ जून रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. २८ आणि २९ जून रोजी शहर आणि उपनगरात पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.