मुंबई : देशात दिल्ली आणि उत्तर प्रदेशसारख्या राज्यात सार्वजनिक वाहतूक खुली करण्यात आहे. याउलट देशाला दिशा दाखविणाऱ्या आणि कायम पुढाकार घेणाºया महाराष्ट्रात प्रवासावर बंदी आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने भीतीपोटी महाराष्ट्राची प्रतिमा डागाळू नये. त्यामुळे तत्काळ जिल्हाबंदी उठवून कलम १४४ काढून टाकावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली.मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत आंबेडकर यांनी बेस्ट आणि एसटी वाहतूक सेवा तसेच लॉकडाऊनबाबत भाष्य केले.ते म्हणाले, एसटीच्या बसेस आणखी काही दिवस चालविल्या नाही तर त्या बसेस थेट भंगारात काढाव्या लागतील. या बसेसच्या जागी खासगी कंत्राटांकडून चालक-वाहकासह बसेस घेण्याचा डाव मांडला जात आहे.या कामगारांच्या हितासाठी वंचित बहुजन आघाडी लढा पुकारण्यास तयार असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. महाराष्ट्रातील आंतरजिल्हा बंदीमुळे दळणवळण ठप्प झाले आहे. कोविड योद्ध्यांनी आपल्या कष्टाने कोरोनाला नियंत्रणात आणले आहे.आता सरकारने आम्ही जगावे की मरावे, याचा विचार करू नये. ज्यांना भिती आहे ते घरात बसतील. तर ज्यांना भिती नाही, कामधाम करायचे आहे ते लोक बाहेर पडतील. त्यामुळे प्रगतीशील महाराष्ट्रात १४४ आणि आंतरजिल्हा बंदी कायम ठेऊन राज्याची प्रतिमा डागाळू नका, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. अन्यथा सध्या कार्यकर्त्यांकडून सुरू असलेले डफली आंदोलन सामान्य नागरिकांसह सुरू करावे लागेल, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
जिल्हाबंदी लवकरात लवकर उठवा; प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 2:28 AM