Join us  

बालगंधर्व स्मारकासाठी चळवळ उभी करू

By admin | Published: November 05, 2015 11:34 PM

विक्रम गोखले : सांगली येथे विष्णुदास भावे गौरव पदक प्रदान

सांगली : निधी उपलब्ध असतानाही नागठाणे येथील बालगंधर्वांचे स्मारक रखडले आहे, ही गोष्ट क्लेशदायी असून, आता शासनदरबारी स्मारकाच्या पूर्णत्वासाठी प्रयत्न करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी चळवळ उभी करून मी स्वत: आघाडी घेण्यास तयार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी गुरुवारी येथे केले. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीच्यावतीने येथील भावे नाट्यमंदिरात गोखले यांना नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा फैयाज यांच्याहस्ते ‘विष्णुदास भावे पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. गौरव पदक, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व अकरा हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. गोखले म्हणाले की, परंपरा जपत मराठी रंगभूमी समृध्द करणाऱ्या विष्णुदास भावे यांच्याइतक्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाची नवीन कलाकारांना ओळख करून देण्यासाठी सांगलीकरांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. नाटकाचे दिग्दर्शन, अभिनय आणि नियोजन या क्षेत्रातील भावे यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व मराठी रंगभूमीला लाभले, हे नशीबच मानावे लागेल. ते केवळ मराठी रंगभूमीचेच नव्हे, तर भारतीय रंगभूमीचे आद्य नाटककार आहेत.ते म्हणाले की, नाट्यपंढरीची सेवा करताना केवळ अभिनय न करता नाट्यक्षेत्रातील दिग्गज रंगकर्र्मींच्या स्मृती जतन करणेही आपले आद्य कर्तव्य आहे. बालगंधर्वांच्या स्मारकाला साडेतीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असतानाही, स्मारकाचे काम रखडले आहे. शासन त्याच्या पूर्णत्वासाठी प्रयत्न करीत नसल्याने आता आपणच आघाडी घेणे गरजेचे आहे. सांगलीतील रसिकांनी यासाठी पुढाकार घ्यावा. या प्रश्नावर मी सहभागी होण्यास तयार आहे.मराठीसह भारतातील कलाकारांना नाट्याभिनयाचे शिक्षण देणाऱ्या संस्थांनी भावे यांचा जीवनक्रम असलेले ‘नाट्यप्रातीक’ हे पुस्तक नवकलाकारांना नक्की वाचण्यास द्यावे. शंभर वर्षापूर्वी भावे यांनी रंगभूमीच्या वृध्दीसाठी केलेल्या कार्याची ओळख आजच्या व्यावसायिक नाटकांच्या काळात होईल. यासाठी आपण स्वत: आईच्या नावाने अखिल भारतीय नाट्य परिषदेला हे पुस्तक भेट देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी सांगलीतील नाट्यदिग्दर्शिका चेतना वैद्य यांचा गोखले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विक्रम गोखले यांच्या पत्नी वृषाली गोखले, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, ज्येष्ठ दिग्दर्शक, मुलाखतकार सुरेश खरे, अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे, उपाध्यक्ष भाऊसाहेब गद्रे, वि. ज. ताम्हणकर, मेधा केळकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)पाच नोव्हेंबर : शेवटच्या श्वासापर्यंत सांगलीतनाट्यक्षेत्रात मानाचे समजले जाणारे विष्णुदास भावे गौरव पदक मिळणे, हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी पाच नोव्हेंबर या रंगभूमीदिनी सांगलीला भेट देणार आहे. त्यादिवशी पूर्ण दिवस येथील कलाकारांना अभिनयाचे धडे देण्यास तयार असल्याचेही गोखले यांनी सांगितले.एक लाखाची देणगीविक्रम गोखले यांनी सांगली येथील अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिरला एक लाखाची देणगी जाहीर केली. दर महिन्याला ८३३४ रुपयांप्रमाणे वर्षभर ही देणगी देऊ, अशी घोषणा त्यांनी केली. नाट्यगृहाला समस्यांतून बाहेर काढा : गोखलेजिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या जिल्ह्यातील कामगिरीचे कौतुक करताना गोखले यांनी सांगलीतील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाला समस्यांतून बाहेर काढण्याचे आवाहन त्यांना केले. राज्यभरात दुरवस्था असलेल्या नाट्यगृहात काम करणे मी बंद केले आहे. सांगलीत दीनानाथांच्या नावे असणाऱ्या नाट्यगृहाची दुरवस्था थांबण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत, असे आवाहनही केले. आयुष्यातील सर्वांत मोठा पुरस्कारनाटकात, चित्रपटात, मालिकांत काम करत असताना अनेक पुरस्कार मिळाले, पण आज मिळालेले विष्णुदास भावे गौरव पदक आयुष्यातील सर्वांत मोठा पुरस्कार असल्याचे गौरवोद्गार विक्रम गोखले यांनी काढले. आयुष्यात यापुढे कुणीही कौतुक केले नाही तर चालेल, इतके कौतुक यातून मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.