‘पुराची माहिती देणारी सार्वजनिक यंत्रणा उभारा’
By Admin | Published: January 17, 2017 06:37 AM2017-01-17T06:37:04+5:302017-01-17T06:37:04+5:30
पूरस्थितीत व अन्य आपत्कालीन स्थितीमध्ये सामान्यांना माहिती देण्यासाठी सार्वजनिक यंत्रणा कार्यान्वित करा
मुंबई : पूरस्थितीत व अन्य आपत्कालीन स्थितीमध्ये सामान्यांना माहिती देण्यासाठी सार्वजनिक यंत्रणा कार्यान्वित करा, अशी सूचना सोमवारी उच्च न्यायालयाने राज्य सरकार व मुंबई महापालिकेला केली.
पुराच्या वेळी लोक एकाच ठिकाणी अडकून बसतात, अशा वेळी त्यांना अन्य ठिकाणी काय स्थिती आहे, याची अजिबात कल्पना नसते. त्यामुळे अन्य ठिकाणी काय स्थिती आहे, हे लोकांना कळवण्यासाठी एखादी यंत्रणा अस्तित्वात असणे आवश्यक आहे. माहिती मिळाल्यावर लोक त्यानुसार निर्णय घेतील, असे मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने म्हटले. पुराच्या वेळी किंवा अन्य आपत्कालीन स्थितीत एफएम रेडिओ लोकांना संबंधित स्थितीची माहिती देण्याऐवजी गाणीच लावतात, असे निरीक्षणही उच्च न्यायालयाने या वेळी नोंदवले. पावसाळ्यात लोकांची गैरसोय होऊ नये, यासाठी उपाययोजना आखण्याकरिता आणि उपनगरात दुसरे डॉप्लर रडार बसवण्याचे निर्देश वेधशाळेला द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका व्यवसायाने वकील असलेले अटल बिहारी दुबे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीत खंडपीठाने सूचना केली. (प्रतिनिधी)