Join us

पगार वाढवा अन् कुत्र्यांपासून वाचवा, निवासी डॉक्टरांची सरकारकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 8:39 AM

Mumbai News: सर, कुत्र्यांचा आमच्या कॅम्पसमध्ये सुळसुळाट झाला आहे. त्यांच्यापासून आम्हाला वाचवा, अशी वेगळी मागणी निवासी डॉक्टरांनी केली. वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर यांनी बुधवारी राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टर संघटनेचे प्रतिनिधी व अधिष्ठातांची बैठक आयोजित केली होती. 

मुंबई - सर, कुत्र्यांचा आमच्या कॅम्पसमध्ये सुळसुळाट झाला आहे. त्यांच्यापासून आम्हाला वाचवा, अशी वेगळी मागणी निवासी डॉक्टरांनी केली. वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर यांनी बुधवारी राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टर संघटनेचे प्रतिनिधी व अधिष्ठातांची बैठक आयोजित केली होती. 

निवासी डॉक्टरांनी या बैठकीत सुरक्षा वाढवा, विद्यावेतन वाढवा आणि ते वेळेत द्या, नवे वसतिगृह बांधा, तसेच आहे त्या वसतिगृहाची डागडुजी करा, या आणि अन्य मागण्यांसह शिक्षणासंदर्भातील मागण्या केल्या. चार तास चाललेल्या या बैठकीत आयुक्तांनी सर्व निवासी डॉक्टरांच्या तक्रारी ऐकून अधिष्ठात्यांना विद्यार्थ्यांच्या मागण्यांनुसार काही प्रस्ताव विभागाला सादर करण्यास सांगितले. मात्र, कोणत्याही प्रकारचे ठोस आश्वासन या बैठकीत मिळाले नसल्याचे निवासी डॉक्टरांनी सांगितले. एका अधिष्ठात्याने सांगितले की, निवासी डॉक्टरांच्या मागण्या रास्त असल्या तरी वसतिगृहाचा प्रश्न सोडविण्यासाठी रुग्णालयाबाहेर भाडेतत्त्वावर इमारत घेतली, तर त्यांना त्या वसतिगृहात जाण्याची इच्छा नसते. 

आमच्या महाविद्यालय परिसरात ४० ते ५० भटकी कुत्री आहेत. महाविद्यालय परिसरातून चालताना भीती वाटते. अनेकदा या गोष्टी प्रशासनाला कळविल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनाही कळविल्या आहेत. मात्र, काही फरक पडला नाही. रुग्णालय परिसरात काही नागरिकांना ही कुत्री चावली आहेत. तीन ते चार डॉक्टरांनाही चावली आहेत. त्यामुळे त्याबाबत प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी बैठकीत आम्ही केली. -डॉ. सूरज पाटील, अध्यक्ष, निवासी डॉक्टर संघटना, वसंतराव नाईक मेडिकल कॉलेज, यवतमाळ

टॅग्स :डॉक्टरमुंबई