ग्रंथ तुमच्या दारी योजनेचा झेंडा परदेशातही रोवला झेंडा
By मनोहर कुंभेजकर | Published: February 25, 2024 05:25 PM2024-02-25T17:25:34+5:302024-02-25T17:25:49+5:30
ही योजना नाशिक, पुणे, ठाणे, मुंबई असा दिमाखदार प्रवास करत महाराष्ट्रभर आणि भारतभर पोहचली आहे.
मुंबई-२७ फेब्रुवारी 'मराठी भाषा गौरव दिन' ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक संस्थेचे माजी विश्वस्त श्री. विनायक रानडे यांनी १२ वर्षापूर्वी केलेल्या निश्चयातून ‘ग्रंथ तुमच्या दारी’ योजनेचा उगम झाला. ही योजना नाशिक, पुणे, ठाणे, मुंबई असा दिमाखदार प्रवास करत महाराष्ट्रभर आणि भारतभर पोहचली आहे.
परदेशात दुबई, ओमान, बहारिन, नेदर्लंड यूएई, टोकियो, अटलांटा, स्वित्झर्लंड, फिनलँड, वॉशिंग्टन डीसी, कॅलिफोर्निया, ओमान, मॉरिशस, सिंगापूर आणि जपान येथील हजारो वाचकापर्यंत मराठी पुस्तके पोहचली आहेत. ग्रंथ तुमच्या दारी मुंबईचे मुख्य समन्वयक डॉ.महेश अभ्यंकर यांनी लोकमतला ही माहिती दिली.“पुस्तक एक सखा आहे, मार्गदर्शक आहे, जीवनप्रेरक आहे. पुस्तकांना जीवनाचा अविभाज्ज भाग बनवा” असे आवाहन त्यांनी तमाम मराठी वाचकांना केले.
मराठी वाचनसंस्कृती रुजावी व वृद्धिंगत व्हावी, मराठी भाषेचा विकास व संवर्धन व्हावे, या एकमेव ध्येयाने प्रेरित असलेला ‘ग्रंथ तुमच्या दारी’ हा उपक्रम मुंबईमधे कौतुकास्पद कामगिरी करत आहे. गोरेगांव- मालाड, कांदिवली ते भाईंदर, जोगेश्वरी अंधेरी ते बांद्रा, दादर ते कुलाबा आणि वडाळा, कुर्ला, पवई, घाटकोपर, भांडुप, देवनार, गोवंडी, ऐरोली अश्या विविध विभागामधे मुंबईत १७५ वाचक केंद्रे आहेत. १०००० वाचक कुटुंबे आणि स्वेच्छेने काम करणार्या २०० हून अधिक समन्वयक यामुळे हा उपक्रम वाढीस लागला आहे. सोसायटी तिथे, ग्रंथ पेटी’ असा आमचा मानस आहे. सर्वानी ‘ग्रंथ तुमच्या दारी’ उपक्रमाशी जुडावे असे आवाहन डॉ.महेश अभ्यंकर यांनी
केले आहे.
ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्रमांतर्गत २५-३५ वाचकांच्या समूहासाठी साहित्याचे कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, विज्ञान, इतिहास, अनुवादित, गूढ कथा, आध्यात्मिक, ऐतिहासिक, विनोदी, वैचारिक, ललित लेख, प्रवासवर्णन असे विविध वाङ्मय प्रकार असलेल्या शंभर पुस्तकांची एक ग्रंथपेटी दिली जाते. दर चार महिन्यांनी प्रत्येक ठिकाणची ग्रंथपेटी बदलून दुसरी पेटी दिली जाते अशी माहिती त्यांनी दिली.
या ठिकाणी आहेत मुंबईतील वाचन केंद्रे
घर, सोसायटी
शाळा, क्लास
ऑफिस
मंदीर, आश्रम
हॉस्पीटल, दवाखाना
उद्यान
ज्येष्ठ नागरिक संघ
महिला मंडळ
सामाजिक संस्था
अग्निशामक दल
पोलिसठाणे, तुरुंग
मराठी भाषा गौरव दिनी असे साजरे होणार विविध कार्यक्रम
• ५ नवीन वाचन केंद्रे
• ग्रंथदिंडी
• पुस्तक द्यावे, पुस्तक घ्यावे
• पुस्तक दान
• वाचक सत्कार
• शालेय मुलांसाठी स्पर्धा