व्हिजन ठेवून जिल्हा उभारा
By Admin | Published: July 1, 2014 11:39 PM2014-07-01T23:39:45+5:302014-07-01T23:39:45+5:30
जिल्ह्याचे कामकाज सुरु करण्याच्या दृष्टीने निवडण्यात आलेल्या सेलटॅक्सच्या नवीन इमारतीला हिरवा कंदील दाखवित पालघर जिल्ह्याचा विकास आराखडा
पालघर : जिल्ह्याचे कामकाज सुरु करण्याच्या दृष्टीने निवडण्यात आलेल्या सेलटॅक्सच्या नवीन इमारतीला हिरवा कंदील दाखवित पालघर जिल्ह्याचा विकास आराखडा बनविताना पाणी, रस्ते, वाहनतळे, सांस्कृतिक केंद्रे इत्यादी गोष्टीचे पुढील पन्नास वर्षांचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून आखणी करण्याच्या सूचना आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
पालघर या नवीन जिल्ह्याची घोषणा करण्यात आल्यानंतर १ आॅगस्टपासून जिल्ह्याच्या कामकाजाला सुरुवात करण्याच्या दृष्टीने आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री गणेश नाईक, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, आमदार आनंद ठाकूर, तालुकाध्यक्ष दामोदर पाटील इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत आज सकाळी उपमुख्यमंत्र्यांचे आगमन झाल्यानंतर त्यांनी सरळ सेलटॅक्स इमारतीची पाहणी केली. त्यांनी तात्काळ प्राथमिक स्वरुपात १ आॅगस्टपासून जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे तीन विभाग तात्काळ सुरु करण्याच्या सूचना दिल्या. पालघर जिल्हा कामकाजासाठी ४६६ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला असून इमारत फर्निचर इत्यादींच्या उभारणीसाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले.
सेलटॅक्स इमारतीकडून पालघरमध्ये शिरल्यानंतर आखुड रस्ते व वाहतुकीच्या खोळंब्याबद्दल नाराजी व्यक्त करीत या मार्गावरील रस्ते हे चार ते सहा पदरी करण्यासाठी जागा आरक्षित ठेवाव्या लागतील. यावेळी काही कडू अथवा कठोर निर्णय घ्यायची वेळ येईल. परंतु ९० टक्के लोकांच्या फायद्यासाठी १० टक्के लोक नाराज झाले तरी चालेल, असे त्यांनी सांगितले. शहराचे नियोजन करताना छोटेसे विमानतळ, बस सुविधा, उद्याने, कचरा प्रकल्प, क्रीडांगणे, पाणी वितरण, रेन हार्वेस्टिंग, सांस्कृतिक केंद्रे, शिक्षण आरोग्य सुविधा, स्मशान - दफनभूमी इत्यादीचे भविष्यातील पन्नास वर्षांचे नियोजन करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या. (वार्ताहर)