-आशिष राणे वसई - आदिवासी भागात सामाजिक, शैक्षणिक व रोजगार निर्मितीसाठी कार्यरत असणार्या पालघर जिल्हातील ‘विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर’च्या आदीवासी भगिनींनी तयार केलेल्या पर्यावरण पूरक बांबूंच्या आकर्षक कंदीलांनी यंदाचे राजभवन पूर्णतः लखलखणार आहे. यंदाच्या दिवाळीत राजभवनात 480 कंदील महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे त्यांच्या सर्व कर्मचार्यांना भेट म्हणून देणार असल्याचे लुकेश बंड यांनी लोकमत ला सांगितले.
अधिक माहिती देताना,लुकेश यांनी सांगितले की,पर्यावरणपूरक शेकडो बांबूंच्या आकर्षक कंदीलांनी यंदा आपले राजभवन लखलखणार असल्याने ‘विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर’च्या आदीवासी भगिनींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ‘वसई पूर्वेस असलेल्या या सेंटर’च्या आदीवासी भगिनींनी तयार केलेले पर्यावरण पूरक बांबूंचे आकर्षक कंदील सुरुवातीला दि 20 ऑक्टोबर रोजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना भेट म्हणून देण्यात आले होते. दरम्यान त्यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ’विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर’च्या आदीवासी भगिनींनी बनविलेल्या बांबूच्या वस्तूंचे कौतुक केले होते.
तसेच रक्षाबंधन सणाच्या वेळी बांबूनिर्मित राख्यांना नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद देत या आदीवासी महिलांचा उत्साह देखील वाढविला होता. याबद्दल ही आभार मानत यंदाच्या दिवाळीत पर्यावरण पूरक आकर्षक आदिवासी महिलांनी बनविलेल्या बांबू कंदिलांचा जास्तीत जास्त वापर जनतेने करावा व या महिलांना सन्मानजनक रोजगार मिळवून देण्यात हातभार लावावा असेही आवाहन करण्यात आले होते.
एकूणच या सेंटर’च्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून महिला सक्षमीकरणा करिता पालघर जिल्हातील आदीवासी, गरजू महिलांना घरकाम सांभाळून आर्थिक हातभार लाभावा व त्यांना सन्मानजनक रोजगार प्राप्त व्हावा या हेतूने विवेक या संस्थेने पुढाकार घेत अशा महिलांना बांबू हस्तकलेचे मोफत प्रशिक्षण देत आहे.
त्यांचाकडून पर्यावरणपूरक बांबू हस्तकलेच्या बहुउपयोगी निरनिराळ्या वस्तू तयार करतात. यामध्ये बांबू हस्तकलेचा समावेश असून प्रशिक्षित महिला 21 प्रकारची आकर्षक उत्पादने तयार करत आहेत. याचाच एक भाग या संस्थमार्फत स्वदेशी आकाशकंदीलची निर्मिती करण्यात आली असून, हे आकाशकंदील पूर्णतः स्वदेशी व पर्यावरण पूरक बांबूनिर्मित आहेत. यात 5 प्रकारचे आकाशकंदील बनविण्यात आले आहेत,तर यात बुध, गुरु आकाशकंदील, शुक्र आकाश कंदील, सप्तर्षी आकाशकंदील, ध्रुव आकाशकंदील याचा देखील समावेश असून विशेष म्हणजे सर्व प्रकारच्या रंगांमध्ये ही बनविण्यात आले आहेत.