Join us

राजभवनातील मोरांना मुंगूस आणि भटक्या श्वानांपासून भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 1:35 AM

राजभवन व्यवस्थापनाने मोरांच्या संवर्धन आणि सुरक्षेसाठी २०१५ साली ‘मायव्हेट ट्रस्ट अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर’ या संस्थेची नियुक्ती केली.

मुंबई : राजभवनात मोर आणि लांडोर पक्ष्यांचा अधिवास पाहायला मिळतो. येथे १५ ते २० मोरांचा अधिवास कायम असतो. परंतु, सध्या राजभवनात मुंगूस, भटके श्वान आणि मांजर यांचा वावर वाढल्याने येथील मोरांची पिल्ले आणि अंडी ते फस्त करत आहेत. त्यामुळे मोरांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी नेमलेल्या खासगी संस्थेने संवर्धनाच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याची टीका निसर्गप्रेमींनी केली आहे.

राजभवन व्यवस्थापनाने मोरांच्या संवर्धन आणि सुरक्षेसाठी २०१५ साली ‘मायव्हेट ट्रस्ट अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर’ या संस्थेची नियुक्ती केली. वर्षभरात मोरांची संख्या वाढेल, अशी हमी संस्थेने व्यवस्थापनाला दिली होती. या संवर्धन प्रकल्पाला ‘सर दोराबजी टाटा ट्रस्ट’ने ४३ लाखांची मदत केली होती. तर वन विभागाकडून मार्गदर्शन आणि तांत्रिक साहाय्य देण्यात आले होते. परंतु संबंधितांंकडून सकारात्मक कामे झाली नसल्याने निसर्गप्रेमींनी खंत व्यक्त केली. मोरांच्या पालनपोषण आणि सुरक्षेचे काम आता राजभवनाचे कर्मचारी, सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस आणि राज्य राखीव पोलीस दलाचे जवान करीत आहेत. मोराच्या ठरलेल्या जागेवर राजभवनाचे कर्मचारी त्यांच्यासाठी धान्य टाकतात. मोरांवर लक्ष ठेवले जाते. श्वान किंवा मुंगूस आढळल्यास त्यांना हटकण्याचे काम राज्य राखीव पोलीस दलाचे जवान करतात, अशी माहिती राजभवनातील अधिकाऱ्यांनी दिली.मोर हा चपळ पक्षी नसून त्याचे धावणे आणि उडणे मंद असते. भटके श्वान, मुंगूस आणि मांजर यांना मोराच्या पिल्लाची शिकार करण्यास सोपे असते. लांडोर मादीला अंडी घालण्यासाठी सुरक्षित जागा लागते. परंतु, मादीला सुरक्षित जागा सापडली नाही, तर ती इमारतीच्या खिडकीवरील जागेवर अंडी देतात. मात्र, यातील काही अंडी उंचावरून खाली पडून नाहीशी होतात.

काही दिवसांपूर्वी एक मोर जखमी अवस्थेत आढळून आला. तेव्हा त्याला पकडून परळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या पायाचे हाड तुटले असून उपचार सुरू आहेत. तसेच उजव्या पायाला सूज आली आहे. औषधे देऊन दुखणे थांबविण्याचा प्रयत्न डॉक्टरांकडून केला जात आहे. दरवर्षी राजभवनातून ५ ते ६ अपघाती प्रकरणे येतात. मोराला १० ते १५ दिवसांत राजभवनाच्या परिसरात सोडले जाईल, अशी माहिती परळ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जे. सी. खन्ना यांनी दिली.