Join us

राज कपूर यांचा चेंबूरमधील बंगला सोल्ड आउट; गोदरेजने एवढ्या कोटींना केला खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 7:25 AM

गोदरेजकडून १०० कोटींना खरेदी, आलिशान गृहप्रकल्प साकारला जाणार

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठे शोमॅन अशी बिरुदावली मिरवणारे, अनेकांना चित्रपटसृष्टीत ब्रेक देणारे दिवंगत अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते राज कपूर यांचा चेंबूर येथील बंगला तब्बल १०० कोटी रुपयांना विकला गेला असून त्या ठिकाणी आता आलिशान गृहनिर्माण प्रकल्प आकार घेणार आहे. गोदरेज प्रॉपर्टीज कंपनीने ही जागा खरेदी केली आहे. कपूर कुटुंबीयांनी या व्यवहाराच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 

चेंबूर येथील टाटा समाजविज्ञान संस्थेच्या आवाराला लागून असलेल्या गल्लीत राज कपूर यांचा हा बंगला एक एकरवर विस्तारला आहे. १९४९ मध्ये त्याची निर्मिती झाली होती. तत्पूर्वी १९४८ मध्ये राज कपूर यांनी बंगल्याला लागून असलेल्या दोन एकर जागेवर आरके स्टुडिओची निर्मिती केली होती. राज कपूर यांच्या या बंगल्याच्या जागेवर आलिशान गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात येणार असून ५०० कोटी रुपयांची उलाढाल होईल, असा अंदाज गोदरेज प्रॉपर्टीजचे कार्यकारी अध्यक्ष पिरोजशा गोदरेज यांनी व्यक्त केला आहे. आरके स्टुडिओची खरेदीही गोदरेज समूहानेच केली  होती, हे विशेष.

 अनेक दिग्गज अभिनेत्यांच्या   घरांचा पुनर्विकास   वांद्र्यातच कार्टर रोड येथे समुद्राच्या समोर सुपरस्टार अभिनेते राजेश खन्ना यांचा ‘आशीर्वाद’ नावाचा बंगला होता. राजेश खन्ना यांचे वास्तव्य याच बंगल्यात होते. त्यांच्या मृत्यूनंतर या बंगल्याचा पुनर्विकास करण्यात आला असून त्या जागी आता आलिशान इमारत उभी आहे. विख्यात गायक आणि अभिनेते किशोर कुमार यांच्या जुहू येथील ‘गौरी कुंज’ या बंगल्याचाही आता कायापालट झाला आहे. क्रिकेटपटू विराट कोहली याने या बंगल्याचे नूतनीकरण करत त्या बंगल्यामध्ये आलिशान हॉटेल सुरू केले आहे.

या बंगल्याबद्दल आम्ही अत्यंत भावनिक असून अनेक दशकांच्या आमच्या अनेक आठवणी याच्याशी निगडित आहे. या प्रकल्पाच्या निमित्ताने गोदरेज समूहाशी आम्ही जोडले जात असल्याचा आम्हाला आनंद आहे. अत्यंत समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जागी नवीन गृहनिर्माण प्रकल्प उभा राहत आहे, त्याचे मी स्वागत करतो.     - रणधीर कपूर, राज कपूर यांचे पुत्र

मुबलक हिरवळ आणि टुमदार बंगलाराज कपूर यांच्या बंगल्याचे वैशिष्ट्य सांगताना ज्येष्ठ चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर यांनी सांगितले की, अत्यंत शांत अशा परिसरात असलेल्या या टुमदार बंगल्याभोवती खूप हिरवळ होती. सुरुवातीच्या काळात कपूर कुटुंबीय एकत्र राहत होते. राज कपूर यांचे या बंगल्यात दीर्घकाळ वास्तव्य होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पार्थिव येथूनच अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले होते. 

कृष्णराज बंगल्याचाही पुनर्विकासवांद्र्यातील पाली हिल येथील नर्गिस दत्त रोडवर राज कपूर यांचा आणखी एक बंगला होता. १९४६ साली बांधण्यात आलेल्या या बंगल्याचे सुरुवातीचे नाव ‘आर के कॉटेज’ असे होते. ऋषी कपूर यांचा विवाह याच बंगल्यात झाला. त्यानंतर त्यांनी या बंगल्याचे नाव बदलत त्याचे नाव ‘कृष्ण राज’ असे केले. या बंगल्याचादेखील आता पुनर्विकास होत आहे.

टॅग्स :राज कपूरमुंबईचेंबूरबॉलिवूड