मुंबई : पॉर्नोग्राफिक व्हिडिओंचे वितरण केल्याप्रकरणी आरोपी असलेल्या राज कुंद्रा याचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळला. न्या. नितीन सांब्रे यांच्या एकलपीठाने राज कुंद्रा याच्या जामीन अर्जावरील निकाल बुधवारी राखून ठेवला होता. गुरुवारी न्यायालयाने राज कुंद्रा याचा जामीन अर्ज फेटाळला. अद्याप तपशिलात आदेश दिलेला नाही. कुंद्रा याच्यासह न्यायालयाने पूनम पांडे, शर्लिन चोप्रा व अन्य तीन जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.
आम्ही या निर्णयाला आव्हान देऊ, असे कुंद्रा याचे वकील सुदीप पासबोला यांनी सांगितले. सायबर सेल आपल्याला या गुन्ह्याशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे. राज कुंद्रा याच्याविरोधात थोडेही पुरावे तपास यंत्रणेकडे नाही. या प्रकरणात असलेल्या आरोपी अभिनेत्रींनी कुठेही राजबाबत तक्रार केलेली नाही, असा युक्तिवाद कुंद्रातर्फे ज्येष्ठ वकील शिरीष गुप्ते यांनी न्यायालयात केला.राज्य कुंद्रा याला अशाच एका प्रकरणात १९ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. ‘हॉटशॉट्स’ या ॲपवरून पॉर्नोग्राफीक चित्रपट वितरित केल्याचा आरोप राज कुंद्रा याच्यावर आहे. याप्रकरणी त्याची सप्टेंबर महिन्यात जामिनावर सुटका करण्यात आली. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे.