लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पॉर्न फ़िल्म प्रॉडक्शन रॅकेट प्रकरणात गुन्हे शाखेने अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा याला सोमवारी रात्री अटक केली. सोमवारी चौकशीअंती ही कारवाई करण्यात आली आहे. कुंद्रा या रॅकेटचा सूत्रधार असल्याचा पोलिसांचा संशय आहे.
मालमत्ता कक्षाने फेब्रुवारीमध्ये हे रॅकेट उघडकीस आणले होते. या कारवाईत यापूर्वी यास्मीन रसूल बेग खान ऊर्फ रोवा यास्मीन दीपंकर खासनवीस (४०), प्रतिभा नलावडे (३३), मोहम्मद आतिफ नासीर अहमद ऊर्फ सैफी (३२), मोनू गोपालदास जोशी (२६), भानुसूर्यम ठाकूर (२६), वंदना रवींद्र तिवारी ऊर्फ गहना वशिष्ठ (३२), उमेश कामत, दीपंकर खासनवीस (३८) यांना बेड्या ठोकल्या होत्या. त्यापाठोपाठ टँनला बेड्या ठोकल्या आहेत.
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, रोवा आणि तिचा पती दीपंकरने हॉटहिट वेबसाइट तयार केली होती. यात दीपंकर हा सहसंचालक आहे. त्यांनी यावरून अनेक पॉर्न व्हिडीओ शेअर केले आहेत तर दुसरीकडे गहनाने परदेशस्थित कंपनीला विविध अश्लील फ़िल्म पाठवून लाखोंची कमाई केली. यात तिचे भारतातील काम पाहणारा उमेश कामत पथकाच्या हाती लागला. तो उद्योजक राज कुंद्रा यांच्या विआन इंडस्ट्रीजमध्ये व्यवस्थापकीय संचालक आहे. त्याच्या अटकेनंतर कुंद्रा तपास यंत्रणांच्या रडारवर आला. त्याच्या विरोधात पुरेसे पुरावे हाती लागल्यानंतर सोमवारी त्याच्याकडे चौकशी करण्यात आली. चौकशीअंती सोमवारी रात्री अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या अटकेच्या वृत्ताला पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दुजोरा दिला आहे.