"माझ्याविरोधात काहीही पुरावे नाहीत", आरोपामुक्ततेसाठी राज कुंद्राची न्यायालयात धाव
By दीप्ती देशमुख | Published: August 24, 2022 03:49 PM2022-08-24T15:49:50+5:302022-08-24T15:52:07+5:30
Raj Kundra : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला जुलै २०२१ मध्ये अटक करण्यात आली. सप्टेंबर २०२१ मध्ये महानगर दंडाधिकारी न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली.
मुंबई : मोबाईल अॅपवर पोर्नोग्राफिक फिल्म्स तयार करणे आणि ती अपलोड केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गेल्या वर्षी गुन्हा दाखल केलेला उद्योगपती राज कुंद्रा याने याप्रकरणी आरोपमुक्त होण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला जुलै २०२१ मध्ये अटक करण्यात आली. सप्टेंबर २०२१ मध्ये महानगर दंडाधिकारी न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली.
अश्लील चित्रपट आपण केले नाहीत किंवा त्यांची विक्रीही केली नाही. आर्मस्प्राईम मीडिया प्रायव्हेट लिमिटेड (एएमपीएल) मध्ये गुंतवणूक केली होती. मात्र, या कंपनीचाही अश्लील चित्रपटांशी काहीही संबंध नाही, असे कुंद्रा याने याचिकेत म्हटले आहे.
पोलिसांनी दाखल केलेल्या पहिल्या आरोपपत्रात माझ्याविरोधात काहीही पुरावे नाहीत किंवा पुरवणी आरोपपत्रात मी व माझ्या कंपनीचा आयटी प्रमुख रायन थॉर्प यांनी पीडितांना जबरदस्ती केली आहे , धमक्या दिल्या आहेत, असेही नमूद करण्यात आले नाही, असे कुंद्रा याने याचिकेत म्हटले आहे.
कोणत्याही कलाकारांनी (एएमपीएलचे क्लायंट) तथाकथित चित्रीकरण आणि कामुक सामग्रीच्या प्रसारणाबाबत कधीही कोणतीही तक्रार केली नाही किंवा कोणताही इशारा दिला नाही, असे याचिकेत म्हटले आहे.
तपासातून प्रथमदर्शनी आपण गुन्हा केल्याचे उघड होत नाही. आरोप निश्चित करण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याने आपल्याला सदर गुन्ह्यातून आरोपमुक्त करण्यात यावे, अशी मागणी कुंद्रा याने केली आहे. कुंद्रा याच्यावर पोलिसांनी ४००० पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे.