मुंबई : सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा याच्या अटकेपाठोपाठ कुंद्रा याच्या कंपनीचा आयटीतज्ज्ञ रायन थॉर्प याला नेरूळमधून अटक करण्यात आली आहे. दोघांना मंगळवारी न्यायालयाने २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यात कुंद्रा हा पोर्न चित्रपट तयार करणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार असून, व्हॉट्सॲपवरून याचे कामकाज सांभाळत असल्याचे तपासात समोर आले आहे.
सदर प्रकरणात मालमत्ता कक्षाने आतापर्यंत एकूण ११ आरोपींना अटक केली आहे. फेब्रुवारीमध्ये अटक करण्यात आलेल्या उमेश कामतच्या चौकशीत कुंद्रा कनेक्शन उघडकीस आले. कामत हा कुंद्रा याच्या विआन इंडस्ट्रियल इस्टेट कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे. कामतने गुन्हे शाखेला दिलेल्या माहितीत, लंडनस्थित असलेल्या केनरिन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक प्रदीप बक्षी हे असून, ते राज कुंद्रा याचे नातेवाईक आहेत.
सध्या राज कुंद्राची कसून चौकशी केली जात आहे. या चौकशीतून अनेक नवनवे खुलासे होत आहेत. यानुसार, कदाचित आपल्यावर येणाऱ्या संकटाची चाहूल राज कुंद्रा यांना आधीच लागली होती. पुढच्या दिवसांत आपण भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर येऊ शकतो, याची कुणकुण लागल्यामुळेच राज कुंद्रानं 'प्लान बी' तयार केला होता.
क्राईम ब्रांचच्या हाती लागलेलं व्हॉट्सअॅप चॅटवरुन राज कुंद्राच्या प्लान बीचा खुलासा होतो. तपासादरम्यान, राज कुंद्राच्या माजी पीए उमेश कामतच्या मोबाईलची तपासणी करण्यात आली. त्यावेळी या मोबाईलमध्ये अनेक असे चॅट्स समोर आले आहेत. जे राज कुंद्राच्या प्लान बीचा खुलासा करतात. प्रदीप बक्शीने हॉटशॉट अॅप नियमांची पूर्तता न केल्यामुळे गूगलनं सस्पेंड केलं असल्याची माहिती ग्रुपमध्ये टाकली होती. त्यानंतर राज कुंद्रानं रिप्लाय दिला की, "काहीच हरकत नाही. प्लान बी सुरु झाला आहे. जास्तीत जास्त 2 ते 3 आठवड्यांत नवं अॅप्लिकेशन लाईव्ह होईल."
दरम्यान, राज कुंद्रा याची पोलीस कोठडीत रवानगी होताच त्याच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरील चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाले. यात प्रदीप बक्षीसोबत आर्थिक व्यवहार, कलाकारांच्या रखडलेल्या पैशांचाही उल्लेख आहे. यात एकूण ८१ कलाकारांचे पैसे देण्याचे बाकी राहिल्याचेही नमूद करण्यात आले आहे.