Join us

राज कुंद्राची रवानगी न्यायालयीन कोठडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 4:05 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पोर्नोग्राफी प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा आणि साथीदार रायन थॉर्पला वाढीव कोठडीसाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पोर्नोग्राफी प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा आणि साथीदार रायन थॉर्पला वाढीव कोठडीसाठी मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने पोलिसांच्या वाढीव कोठडीला नकार देत कुंद्रा आणि रायनला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर कुंद्राकडून जामिनासाठी अर्ज करण्यात आला असून, बुधवारी त्यावर सुनावणी होणार आहे.

गुन्हे शाखेने न्यायालयात माहिती देताना सांगितले, ॲपल स्टोअरकडे हॉटशॉट संबंधित मागविलेल्या माहितीत, हॉटशॉटसाठी ॲपलकडून १ कोटी १३ लाख ६४ हजार ८८६ रुपये मिळाले होते. त्यानुसार, हे पैसे कुंद्राच्या कोटक महिंद्रा बँकेत जमा झाल्याचीही माहिती मिळते आहे. त्यामुळे कुंद्राच्या सिटी बँक आणि कोटक महिंद्रा बँकेचे खाते गोठविण्यात आले आहे. तसेच गुगलवरील व्यवहाराची माहिती येणे बाकी असल्याचे सांगण्यात आले.

२४ जुलै रोजी कुंद्राच्या कार्यालयात टाकलेल्या छाप्यात विदेशी व्यवहाराची माहिती गुन्हे शाखेच्या हाती लागली आहे. तसेच कुंद्राच्या मोबाइल आणि रायनच्या लॅपटॉपमधून हॉटशॉट संबंधित व्यवहाराचे चॅटिंग हाती लागल्याची माहिती न्यायालयात दिली. कुंद्रा याच्या घरातून अनेक इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त करण्यात आले आहेत. याबाबत फॉरेन्सिक ऑडिटर नेमण्यात आला आहे. फॉरेन्सिक ऑडिटरसमोर आरोपीची चौकशी करायची असल्याचे सांगत, कुंद्राच्या कोठडीत आणखीन ७ दिवसांची वाढ करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. त्याने डिलिट केलेला तपशीलही मिळविण्यात येत असल्याचे नमूद केले. मात्र, कुंद्राच्या वकिलाने याला विरोध केला. दोघांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने पोलिसांची वाढीव कोठडीची मागणी फेटाळली.