मुंबई : अश्लील चित्रपटासंबंधी सायबर पोलिसांनी २०२० मध्ये दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी व्यावसायिक राज कुंद्रा याने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सध्या राज कुंद्रा मुंबई मालमत्ता गुन्हे शाखेने अश्लील चित्रपट निर्मिती व प्रसारित केल्याबाबत दाखल केलेल्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत आहे.
सायबर पोलिसांनी गेल्यावर्षी नोंदविलेल्या गुन्ह्यात माझे नाव नव्हते. पोलिसांना तपासासाठी सहकार्य करण्याकरिता मी अनेकवेळा तपास अधिकाऱ्याला भेटलो आणि माझा संपूर्ण जबाब दिला आहे, असे कुंद्रा याने याचिकेत म्हटले आहे.
तपास अधिकाऱ्यांना सर्व आवश्यक कागदपत्रे दिली. तसेच सर्व सरकारी साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत, असेही याचिकेत म्हटले आहे.
फेब्रुवारी २०२० मध्ये माझ्या ओळखीच्या एका व्यक्तीने मला आर्म्सप्राइम मीडिया प्रा.लि. मध्ये गुंतवणूक करण्याचा आग्रह केला. ही कंपनी नवीन कलाकारांना त्यांचे टॅलेंट दाखविण्याची संधी देते. या कंपनीची कल्पना आवडल्याने मी त्यात गुंतवणूक केली. या कंपनीशी केवळ फेब्रुवारी ते डिसेंबर या कालावधीपुरताच जोडला होतो. त्या कंपनीच्या कंत्राट तयार करण्याच्या कामात कधीच सक्रिय सहभाग घेतला नव्हता. या कंपनीने तयार केलेल्या ‘हॉटशॉट’ या ॲपचा आणि अश्लील चित्रपटांचा काहीही संबंध नाही, असा दावा कुंद्रा याने केला आहे.
याच कलमांतर्गत अन्य एका प्रकरणी पोलिसांनी अटक केली असून, माझ्या घरावर आणि कार्यालयावर छापा टाकून सर्व पुरावे जप्त केले आहेत. या प्रकरणातील अन्य आरोपी शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांची उच्च न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे, असे कुंद्रा याने याचिकेत म्हटले आहे. लवकरच उच्च न्यायालयात या याचिकेवर सुनावणी होईल.