लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पोर्नोग्राफी फिल्म्सप्रकरणी तपासास सहकार्य करत नसल्याने व्यावसायिक राज कुंद्रा याला अटक करण्यात आली, अशी माहिती मुंबई पोलिसांनी उच्च न्यायालयाला गुरुवारी दिली.
राज कुंद्राच्या याचिकेवर मुंबई पोलिसांनी गुरुवारी प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यात राज कुंद्रावर माहिती व तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६७ (ए) अंतर्गत केलेली कारवाई योग्य असल्याचे म्हटले आहे.
राज कुंद्राला मुंबई क्राईम ब्रँचने १९ जुलै रोजी अटक केली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. बुधवारी दंडाधिकारी न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला.
कुंद्रा याने पोलिसांनी आपल्याला अटक करण्यापूर्वी सीआरपीसी कलम ४१ (ए) अंतर्गत नोटीस बजावली नसल्याचा दावा न्यायालयात केला आहे. मात्र, राज्य सरकारने हा दावा फेटाळला. कुंद्राला नोटीस बजावण्यात आली होती, मात्र त्याने ती स्वीकारली नाही. त्याने नोटीस स्वीकारली नाही, याचा अर्थ त्याने तपासास सहकार्य करण्यास नकार दिला, असे पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
चौकशीला बोलावण्यापूर्वी दोन आठवड्यांपूर्वी कलम ४१ (ए) अंतर्गत नोटीस बजावण्यात येते. या प्रकरणी कुंद्राला दोन तासांपूर्वीही नोटीस देण्यात आली नाही. १९ जुलै रोजी दुपारी त्याच्या कार्यालयाची झडती घेण्यास सुरुवात केली. सुमारे तीन-चार तास ही झडती सुरू राहिली. त्यानंतर त्यांनी कुंद्रा याला पोलीस ठाण्यात नेले आणि अटक केली, असा युक्तिवाद कुंद्रा यांच्या वतीने ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी न्यायालयात केला.
कार्यालयाच्या झडतीवेळी कुंद्रा व त्याचा आयटी टेक्निशियन रायन थॉर्प यांनी मोबाइलमधील व्हॉट्सॲप ग्रुप डिलीट करण्यास सुरुवात केली. ते पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न करत होते, असा दावा पोलिसांनी केला आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणी ३१ जुलै रोजी ठेवण्यात आली आहे.