उच्च न्यायालयात याचिका
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दंडाधिकारी न्यायालयाने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याला २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र, न्यायालयाने सुनावलेली पोलीस कोठडी कायदेशीर नसल्याचे सांगत राज कुंद्रा यांनी अटकेलाच उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
पोर्नोग्राफीक फिल्म्सची निर्मिती करून वितरण केल्याच्या आरोपांतर्गत राज कुंद्राला १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली. न्यायदंडाधिकाऱ्यांनी राज कुंद्राला २७ जुलैपर्यंत कोठडी सुनावली.
न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुनावलेली ही कोठडी कायद्याचे उल्लंघन करणारी आहे. कारण अटक करण्यापूर्वी फौजदारी दंडसंहिता (सीआरपीसी) ४१ (ए) दिली नाही. विशेषतः कोरोनाच्या काळात ही नोटीस देणे आवश्यक आहे. ४१ (ए) कलमानुसार, एखाद्या आरोपीला अटक करण्याची आवश्यकता नसेल तर पोलीस त्याला समन्स बजावून त्याचा जबाब नोंदवू शकतात. मात्र, या प्रकरणी पोलिसांनी कायद्याने बंधनकारक असलेली नोटीस बजावली नाही, असे कुंद्रा याने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे.
पोलीस ज्या गोष्टी पोर्नोग्राफिक असल्याचा दावा करीत आहेत त्यामध्ये थेट लैंगिक दृश्ये किंवा शारीरिक संबंध दाखविण्यात आलेले नाहीत. एखाद्या लघुपटात प्रणय दृश्ये दाखविण्यात येतात तशी आहेत. ती दृश्ये पाहणारा फारतर कामातुर होऊ शकतो. त्यामुळे पोलीस माहिती व तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६७ (ए) आपल्यावर लावू शकत नाहीत. फारतर कलम ६७ (कामातुर कंटेट प्रसिद्ध करणे) अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते, असे याचिकेत म्हटले आहे.
१९ जुलै २०२१ रोजी पोलिसांनी कुंद्राच्या कार्यालयावर छापा मारला आणि त्याला पोलीस ठाण्यात जबाब नोंदविण्यासाठी हजर राहण्यास सांगितले. पोलिसांनी जबाब नोंदविण्याच्या नावाखाली बोलावून थेट अटक केली. त्यानंतर पोलिसांनी कुंद्राला सीआरपीसी ४१ (ए) नोटीसवर सही करण्यास सांगितले. मात्र, कुंद्राने त्या नोटीसवर सही करण्यास नकार दिला, असे याचिकेत म्हटले आहे.
जे गुन्हे आपल्यावर नोंदविण्यात आले आहेत, त्या गुन्ह्यांतंर्गत आपल्याला सात वर्षे कारागृह इतकी शिक्षा होऊ शकते. नोटीस न बजावल्याने पोलिसांनी आपल्याला केलेली अटक बेकायदेशीर आहे, असे याचिकेत म्हटले आहे.
या प्रकरणी फेब्रुवारी २०२१ मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला तेव्हा आपले आरोपी म्हणून नाव नव्हते. एप्रिलमध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आणि अनेक आरोपींना जामीनही मंजूर करण्यात आला आहे, असे कुंद्राने याचिकेत म्हटले आहे.
कुंद्राच्या पोलीस कोठडीत वाढ
पोर्नोग्राफीक फिल्म्सची निर्मिती करून त्यांचे वितरण केल्याचा आरोप असलेले राज कुंद्रा आणि रायन थॉर्प यांना दंडाधिकारी न्यायालयाने २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडी वाढविण्याच्या दंडाधिकाऱ्यांच्या निर्णयाला कुंद्रा यांच्या वकिलांनी विरोध केला.
कुंद्रा व रायन यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची विनंती करताना पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, ऑनलाइन बेटिंगमध्ये पोर्नोग्राफीतून मिळविलेला पैसा वापरण्यात आल्याची शक्यता आहे. न्यायालयाने पोलिसांचा युक्तिवाद मान्य करीत कुंद्रा व रायन यांच्या पोलीस कोठडीत वाढ केली.