हॉटहीट ॲपचे बँक व्यवहार उघड
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योगपती राज कुंद्राच्या ‘हॉटशॉट’प्रमाणे हॉटहीट, न्यूफिल्क्स ओटीटी ॲपवरही अश्लील फिल्म आणि वेबसिरीज दाखवल्या जात आहेत. देशविदेशातील लाखो जणांनी हे ॲप डाऊनलोड केले आहे. त्यातून हॉटहीटद्वारेही कुंद्रा याच्या कंपनीच्या विविध खात्यांत लाखो रुपये जमा झाल्याची माहिती व्हायरल चॅटमधून समोर आली आहे.
कुंद्राच्या विआन कंपनीच्या विविध बँक खात्यांत परदेशातून पैसे जमा झाल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार कुंद्राकडे तपास सुरू आहे. यातच, हॉटशॉटप्रमाणेच आता हॉटहीटद्वारेही खात्यात दोन ते तीन दिवसांच्या फरकाने लाखो रुपये जमा होत असल्याचे दिसून आले. २० डिसेंबर ते ३ फेब्रुवारीपर्यंतचे बँक तपशील व्हायरल झाले आहेत. मुंबई पोलिसांनी अशाप्रकारे आतापर्यंत २ हजार व्हॉट्सअॅप चॅटची पाने पुरावे म्हणून ताब्यात घेतली आहेत.
आरोपी गहना वशिष्ठ आणि तिच्या टोळीने तयार केलेले पोर्न चित्रपट हॉटहीटमूव्हीज या अॅपवर प्रदर्शित केले जात होते. या अॅपचा मालक दीपांकर बॅनर्जी ऊर्फ शान याला गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने फेब्रुवारीमध्ये अटक केली आहे. दीपांकर हा रोवा खानचा पती असून, दोघांनी दोन वर्षांपूर्वी हे अॅप तयार केले होते. सुरुवातीला त्यावर बेस मालिका प्रदर्शित केल्या गेल्या. हळूहळू या अॅपचा वापर पोर्न, अश्लील चित्रपटांसाठी होऊ लागला. शान हिंदी चित्रपटसृष्टीशी संबंधित आहे. पेशाने छायाचित्रकार असून, त्याने हिंदी चित्रपटांसाठी धडपडणाऱ्या तरुणांसाठी छायाचित्रण केले आहे.
हॉटहीट बँक खात्यात जमा झालेल्या पैशाचा तपशील
२०२०
२० डिसेंबर ३ लाख
२५ डिसेंबर १ लाख
२६ डिसेंबर १० लाख
२८ डिसेंबर ५० हजार
२०२१
३ जानेवारी २ लाख ५ हजार
१० जानेवारी ३ लाख
१३ जानेवारी २ लाख
२० जानेवारी १ लाख
२३ जानेवारी ९५ हजार रुपये
३ फेब्रुवारी २ लाख ७० हजार
परदेशातून मोठ्या प्रमाणात उलाढाल
राज कुंद्रा याच्या विआन इंडस्ट्रीजच्या नावाने असलेल्या विविध बँक खात्यांत परदेशातून मोठमोठ्या रकमा जमा झाल्या आहेत. हे पैसे कुंद्रा याला हॉटशॉट अॅपच्या देखभालीसाठी दिले असल्याची माहिती समोर आली आहे.
तन्वीरच्या खात्यातही केनरिनद्वारे पैसे जमा
सुरतमधून अटक केलेल्या तन्वीर हाश्मीच्या इंडियन बँकेतील खात्यात डिसेंबरमध्ये तसेच गहना वशिष्ठ हिच्या खात्यात केनरिन प्रायव्हेट लिमिटेडकडून रक्कम जमा झाल्याचेही दिसून आले. याबाबतही कुंद्राकडे चौकशी सुरू आहे. तन्वीर हा ओटीटीवर व्हिडिओ अपलोड करायचा.