लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पॉर्न चित्रपट तयार करणाऱ्या टोळीत उद्योगपती राज कुंद्रा याच्या मुख्य सहभागामुळे खळबळ उडाली आहे. मात्र, यापूर्वीदेखील कुंद्रा हा मॅच फिक्सिंगपासून ते बिटकॉइन घोटाळ्यापर्यंत अनेकदा वादात अडकलेला आहे.
बलात्काराची धमकी दिल्याचा पूनम पांडेचा आरोप
मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेने राज कुंद्रावर बलात्कार तसेच, तिला जिवे मारण्याची आणि अॅसिड फेकण्याची धमकी दिल्याचा आरोप केला होता. तिच्या आरोपानुसार राज कुंद्राच्या कंपनीबरोबरचा तिचा करार संपल्यानंतरही त्याच्या कंपनीतील लोकांनी तिचा नंबर व तिचे व्हिडिओ परवानगीशिवाय वापरले. मात्र, हे आरोप कुंद्रा याने फेटाळले होते. ज्या कंपनीने अश्लील व्हिडिओ बनविल्याचा आरोप आहे, त्या कंपनीशी आपला संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले होते.
....
आयपीएल मॅच फिक्सिंग
राज कुंद्रा याचे नाव २०१५ मध्ये इंडियन प्रीमियर लीगमध्ये सट्टेबाजीच्या प्रकरणातदेखील आले होते. कुंद्रा राजस्थान रॉयल्स संघाचा सह-मालक होता. या प्रकरणात त्याचा साथीदार आणि तो दोषी आढळला. त्यानंतर त्याच्यावर आणि टीमवर दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती.
बिटकॉईन घोटाळा
२०१८ मध्ये राज कुंद्रा याचे नाव बिटकॉईन घोटाळ्यातही आले होते. या प्रकरणात, राज कुंद्रा याची अंमलबजावणी संचालनालयाने चौकशीही केली होती. पुण्यातील दोन व्यावसायिक अमित भारद्वाज आणि गेनबिटकॉइन कंपनीचा संचालक असलेला त्याचा भाऊ विवेक भारद्वाज यांच्यावर क्रिप्टो करन्सी योजनेच्या माध्यमातून ८ हजारांहून अधिक लोकांची फसवणूक केल्याचा आरोप होता.
पहिल्या पत्नीपासून घटस्फोटाचा वाद
राज कुंद्राने २००५ मध्ये कविताशी लग्न केले होते. २००७ मध्ये राज कुंद्राने कविताशी घटस्फोट घेतला आणि त्यानंतर दोन वर्षांनी त्याने शिल्पा शेट्टीशी लग्न केले. कविताशी ब्रेकअप झाल्यानंतर एका मुलाखतीत राज कुंद्राने कवितावर गंभीर आरोप केल्याने तो वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.
ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून फसवणूक
२०१७ मध्येही ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून एका व्यापाऱ्याला लाखो रुपयांना गंडा घातल्या प्रकरणात त्याचे आणि शिल्पा शेट्टीचे नाव चर्चेत आले होते. शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि त्यांच्या तीन साथीदारांविरोधात याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
इकबाल मिर्ची कनेक्शन
अंडरवर्ल्ड डॉन इकबाल मिर्चीचा साथीदार रंजित सिंघ बिंद्रासोबत राज कुंद्राने व्यावसायिक करार केल्याची माहिती ईडीला मिळाली होती. त्यानुसार २०१९ मध्ये कुंद्राची चौकशी करण्यात आली. मात्र कुंद्राने या आरोपांचेदेखील खंडन केले होते.