मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दादरमधील निवासस्थानाजवळ होणा-या हॉकर्स झोनवरुन मोठा वाद झाल्यानंतर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी हॉकर्स झोनची यादी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. महापौरांनी महापालिका प्रशासनाला हॉकर्स झोनची नवी यादी तयार करण्यास सांगितली आहे. महापालिकेने राजकीय नेत्यांच्या निवासस्थानाजवळ हॉकर्स झोन ठेवल्याने वादंग झाला.
राज ठाकरेंचे कृष्णकुंज निवासस्थान आणि काँग्रेस आमदार नितेश राणे यांच्या घराजवळ हॉकर्स झोन प्रस्तावित होते. राज ठाकरेंनी फेरीवाल्यांविरोधात आंदोलन पुकारले त्यामुळे महापालिका जाणीवपूर्वक राज ठाकरेंच्या निवासस्थानाजवळ फेरीवाल्यांसाठी हॉकर्स झोन उभारत असल्याचा आरोप मनसेने केला होता.
राजकीय नेते, सेलिब्रिटींच्या घराजवळ हॉकर्स झोन पण उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीजवळ हॉकर्स झोन का नाही ? असा सवाल विरोधीपक्षाच्या नेत्यांनी विचारला. आमच्या घराबाहेर फेरीवाले बसवले तर मातोश्राबाहेर फेरीवाले उभे करणार असा इशारा नितेश राणेंनी दिला होता. हॉकर्स झोनवरुन वातारवण तापू लागल्याने अखेर महापौरांनीच यादी रद्द करण्याचे आदेश दिले. जुन्या फेरीवाला धोरणानुसार हॉकर्स झोनची ही यादी बनवण्यात आली होती.