"बर्फातला प्राणी बर्फात पाठवूया, संदीप वरळीत आणूया"; आदित्य ठाकरेंविरोधात मनसेची पोस्टरबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 01:27 PM2024-06-22T13:27:36+5:302024-06-22T13:28:25+5:30
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची शिवसेना विरुद्ध मनसे असा सामना रंगताना दिसत आहे
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. यावरून शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे आत्तापासून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची शिवसेना विरुद्ध मनसे असा सामना रंगताना दिसत आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघात दोन्ही पक्ष आमने-सामने आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
वरळीत मनसेने आदित्य ठाकरे यांच्याविरोधात पोस्टर्स लावले आहेत. त्या पोस्टर्सवर आदित्य ठाकरेंविरोधात उल्लेख करण्यात आला आहे. "बर्फातला प्राणी बर्फातच पाठवूया, जनमनातला आमदार, संदीप वरळीत आणूया. वरळीचे भावी आमदार संदीप देशपांडे सन्माननीय राज ठाकरे यांचा विश्वासू शिलेदार विधानसभेत पाठवूया. यंदा वरळीकरांचं ठरलंय", असे या पोस्टर्सवर लिहिले आहे. मनसे कार्यकर्ते हर्षल खरात यांनी हे पोस्टर्स लावले आहेत. याच पोस्टरच्या माध्यमातून विधानसभेसाठी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना जिंकवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, आदित्य ठाकरे हे शिवसेना ठाकरे गटाचे वरळी विधानसभेतील विद्यमान आमदार आहेत. गेल्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे हे पहिल्यांदा निवडणुकीत उतरले होते. त्यावेळी ठाकरे कुटुंबियातील पहिली व्यक्ती निवडणूक लढत असल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांच्याविरोधात कोणताही उमदेवार दिला नव्हता. मात्र, यंदा त्यांच्याविरोधात मनसेकडून संदीप देशपांडे हे निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तविली जात आहे.