Raj Thackeray : "उद्धव ठाकरेंच्या हातात राज्य आलंय की, त्यांच्यावर 'राज्य' आलंय?'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 12:34 PM2021-04-06T12:34:36+5:302021-04-06T13:48:07+5:30
Raj Thackeray : पत्रकार परिषदेत राज ठाकरे म्हणाले की, हॉस्पिटलमध्ये बेड्स असून कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध होत नाही. महापालिकेच्या सवलती मिळूनही हॉस्पिटल अशाप्रकारे प्रकार करत आहेत.
मुंबई - राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिनी लॉकडाऊन आणि अनिल देशमुख यांचा राजीनामा यासह विविध विषयांवर राज ठाकरेंनी भाष्य केले. आधी जो कोविड आला त्यापेक्षा दुसरी कोरोनाची लाट भयंकर आहे, पण हे महाराष्ट्रातच का वाढतेय? महाराष्ट्र औद्योगिक राज्य असल्याने बाहेरील राज्यातून येणाऱ्या लोकांची संख्याही जास्त आहे, ते एक प्रमुख कारण राज यांनी सांगितलं. तसेच, दहावी-बारावीच्या परीक्षांपासून ते राज्य सरकारचं कामकाज, रुग्णालयांची भूमिका यासंदर्भात राज यांनी स्पष्ट भूमिका मांडली. यावेळी, राज ठाकरेंनी एका विनोदातून मुख्यमंत्र्यांना चिमटाही काढला.
पत्रकार परिषदेत राज ठाकरे म्हणाले की, हॉस्पिटलमध्ये बेड्स असून कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध होत नाही. महापालिकेच्या सवलती मिळूनही हॉस्पिटल अशाप्रकारे प्रकार करत आहेत. ग्लोबल हॉस्पिटलमध्ये १ हजार बेड्स दाखवतात आणि कोणी गेले तर रुग्णांना बेड्स देत नाही. सामान्य नागरिकांना बेड्स उपलब्ध होत नाहीत. आमदार, खासदारांनी फोन केल्यावर बेड्स उपलब्ध करून देणार. हॉस्पिटलला सरकारने जाणीव करून द्यावी. आमची जाणीव करून द्यायची पद्धत वेगळी आहे. पण सध्या ती वेळ नाही असा इशारा त्यांनी दिला. तर, गेल्या एक ते दीड वर्षात सरकारच्या कामापेक्षा जास्त बदनामीचीच चर्चा आहे का? असा प्रश्न पत्रकाराने विचारला होता. त्यावर, राज यांनी मजेशी उत्तर दिलंय.
मला काल एक विनोद एकाने सांगितला, 'सध्या उद्धव ठाकरेंची परिस्थिती पाहून त्यांच्या हातात राज्य दिलं आहे का त्यांच्यावर राज्य आलं आहे?' #RajThackerayLive
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) April 6, 2021
मला काल एक विनोद आला होता, 'सध्या उद्धव ठाकरेंची परिस्थिती पाहून त्यांच्या हातात राज्य दिलं आहे का त्यांच्यावर राज्य आलं आहे?' असा मजेशीर टोलाही राज यांनी लगावला.
झूम मिटींगद्वारे मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
बाहेरून येणाऱ्या माणसांची कोरोना चाचणी करावी असं सांगितलं होतं, परंतु सरकारने ते केलं नाही. आपण या सगळ्या गोष्टीला बंधन घालत नाही, त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिक घरात अडकून पडतोय, त्यामुळे सगळ्या लोकांची वाताहत होणं हे चांगले लक्षण नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे भेटीची विनंती केली होती, परंतु त्यांच्या आसपासच्या अनेक लोकांना कोरोना झाल्यानं मुख्यमंत्रीही क्वारंटाईन आहेत, त्यामुळे झूमवर आमचं बोलणं झालं. पुन्हा एकदा लॉकडाऊन असं लोकांमध्ये पसरलं, रुग्णसंख्या वाढतेय. मी तक्रारींचा पाढा वाचला नाही तर सूचनांचा पाढा वाचला असं राज ठाकरेंनी सांगितलं.
राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केलेल्या सूचना
छोटे उद्योजक, व्यापारी यांना उत्पादन करण्यास सांगितलं आणि विक्रीवर बंदी आणली, मग त्यासाठी आठवड्यातून किमान २-३ दिवस छोटे व्यापारी, दुकानं उघडी ठेवली पाहिजे.
लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय बंद आहे, लोकांकडे पैसे नाही. त्यात बँका कर्जासाठी दबाव टाकत आहे. अनेक ठिकाणी सक्तीनं लोकांकडून पैसे वसूल केले जात आहे. त्याबाबत बँकांना सूचना द्यावी
सरसकट लॉकडाऊन काळात वीजबिल माफ करणे, व्यावसायिकांना ५० टक्के जीएसटी करात सवलत द्यावी यासाठी केंद्र सरकारशी बोलावं, लोकांना दिलासा देणं महत्त्वाचं आहे. सतत लॉकडाऊन लावणं योग्य होणार नाही.
कंत्राटी कामगारांना लॉकडाऊन काळात घेतलं. पण कोरोना लाट ओसरली त्यानंतर त्यांना कामावरून काढून घेतलं. या कंत्राटी कामगारांना पुन्हा कामावर घ्यावं पण त्यांना काढू नये.
क्रिडा, मनोरंजन क्षेत्रात जे कलाकार, खेळाडू यांच्यासाठी सवलत असणं गरजेचे आहे. सराव करण्यासाठी परवानगी द्यावी. सरकारच्या तिजोरीची अवस्था सगळ्यांना माहिती आहे. पण शेतकऱ्यांना हमीभावासाठी पैसे द्यावेत
शाळा बंद आहेत मग फी आकारणी का होतेय? शाळांनी फी घेऊ नये. मुलांचं वर्ष फुकट जात आहे. १०, १२ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढे ढकललं पाहिजे. लहान मुलांच्या आयुष्यावर परिणाम होत आहे. १० वी, १२ वी परीक्षा न घेता त्यांना पास करावं. विद्यार्थ्यांचा विचार करताय तसा शाळांमधील कर्मचाऱ्यांचाही विचार व्हावा अशा विविध मागण्या राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना(CM Uddhav Thackeray) केल्या आहेत