Raj Thackeray: नवं सरकार आल्यानंतर पहिलीच मोठी सभा; राज ठाकरेंच्या निशाण्यावर कोण?, उत्सुकता शिगेला!
By मुकेश चव्हाण | Published: November 27, 2022 09:20 AM2022-11-27T09:20:05+5:302022-11-27T09:21:19+5:30
Raj Thackeray: आज मुंबईतील गोरेगावमधील नेस्कोला दुपारी ४ वाजता मनसेच्या गटाध्यक्षांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
मुंबई- आज मुंबईतील गोरेगावमधील नेस्कोला दुपारी ४ वाजता मनसेच्या गटाध्यक्षांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात मनसेप्रमुखराज ठाकरे संबोधित करणार आहे. मे महिन्यात राज ठाकरे यांनी औरंगाबादला शेवटची सभा घेतली होती. त्यानंतर काहीच दिवसात राज्यातील महाविकास आघाडीच सरकार कोसळलं आणि राज्यांत नवं सरकार आलं. राज्यात नवीन सरकार आल्यानंतर राज ठाकरेंचा हा पहिलीच मोठी सभा होणार आहे. त्यामुळे या सभेत राज ठाकरे नेमकं कुणावर निशाणा साधणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
गटाध्यक्षांच्या मेळाव्याआधी मनसेने एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी घसरली आहे असं वाटतं ना? चला तर मग, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पर्याय द्यायला तयार आहे, असं म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी घसरली आहे असं वाटतं ना? चला तर मग 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' पर्याय द्यायला तयार आहे...! pic.twitter.com/BrFADsrEHN
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) November 25, 2022
राज ठाकरे यांच्या उत्तर मुंबईतील मागाठाणे आणि चारकोप विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून दौऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात मराठी भाषिक मतदार निर्णायक भूमिका बजावतात. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेच्या किमान ७-८ नेत्यांनी निवडणूक जिंकून नगरसेवक व्हावे. स्थानिक पातळीवर मनसेच्या नेत्यांकडून या प्रकाराची व्यूहरचना केली जात आहे.
दरम्यान, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा- शिंदे सेना व मनसे अशी युती होणार असल्याची चर्चा आहे. त्यातच राज ठाकरे यांनी केलेल्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देण्याची भूमिका शिंदे, फडणवीस यांनी घेतल्याचे अलीकडे दिसत आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मसनेप्रमुख राज ठाकरे यांची सरकार स्थापन झाल्यापासून अनेकवेळा भेटीगाठी होत आहे. त्यामुळे शिंदे गट, भाजपा आणि मनसेच्या युतीची चर्चा रंगली आहे.
मनसेकडे अनेक प्रभागात चांगले उमेदवार नाही. त्यामुळे त्यांचा वापर ठाकरे गटाची मतं फोडण्यासाठी करता येईल, असा भाजपाचा प्लॅन आहे. तसेच ज्या जागांवर मनसेचं वर्चस्व आहे, असा जागांवर भाजपाकडून उमेदवार दिला जाणार नाही, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे याचा राज ठाकरेंना फायदा होणार की तोटा, हे आगामी काळातच समोर येईल.
मुंबई मनपात मनसेची कामगिरी-
२००७ मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेने पहिल्यांदाच निवडणूक लढवली होती आणि ७ जागा जिंकल्या. त्यानंतर २०१२च्या महापालिका निवडणुकीत २७ जागा आणि २०१७ च्या निवडणुकीत फक्त ७ जागा जिंकल्या होत्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"