Raj Thackeray : 'अलीबाबा आणि त्यांचे चाळीस यांनाच कंटाळून गेले', उद्धव ठाकरेंवर टीका; एकनाथ शिंदेंना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 09:13 PM2023-03-22T21:13:58+5:302023-03-22T21:14:15+5:30
'हा माणूस कोरोना काळात भेटायला तयार नव्हता. आता अचानक बाहेर यायला लागला.'
मुंबई: आज गुढी पाडव्याच्या निमित्ताने मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क मैदानात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. या सभेत त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवरही निशाणा साधला. यावेळी त्यांनी राज्यातील परिस्थिती आणि राजकारणावरुन खोचक टीकाही केली.
आज बाळासाहेब अससते तर...
राज ठाकरे म्हणाले, 'आज जी परिस्थिती झालीये, ती बाळासाहेब असते तर होऊ दिली नसती. सहानभुती मिळवण्यासाठी सगळीकडे फिरायचं आणि रडगाण सांगत बसायचं. स्वतः काय शेण खाल्लं...? मागच्या काही गोष्टी मला तुम्हाला परत सांगायच्या आहेत. शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणूक लढवली. महाराष्ट्रातल्या मतदारांनी आता विचार करण्याची गरज आहे. तुम्ही मतदान करणार आणि हे यांचा खेळ करत बसणार. 2019 ची निवडणूक झआली आणि त्यानंतर उद्ध ठाकरेंनी वेगळी भूमिका मांडली. अडीच वर्षांचा मुख्यमंत्री होण्याची अट घातली. चार भिंतींमध्ये चर्चा झाल्याचे म्हटले. मग खुल्या स्टेजवर तुम्ही काहीच का बोलला नाहीत? तुम्हाला समजलं की, आमच्याशिवाय यांना सरकार स्थापन करता येणार नाही, त्यानंतर तुम्ही अडीच वर्षांचा मुख्यमंत्री होण्याची अट घातली.'
संबंधित बातमी- 'मी शिवसेना पक्ष जगलो, पण आज त्यांची अवस्था पाहून वाईट वाटतं', राज ठाकरे स्पष्टच बोलले
अलीबाबा आणि चाळीस गेले...
'भाजपने नकार दिल्यानंतर काय केलं? ज्यांच्याविरोधात लढलात, त्यांच्यासोबत जाऊन मुख्यमंत्री झाला. त्याआधी भाजपने अजित पवारांसोबत शपथविधी केला. अरे काय सुरू आहे...ही सगळी थेर बंद करा. यासाठीच राज्यातल्या जनतेने तुम्हाला मतदान केलं का? मी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये बोललो होतो आणि जूनमध्ये व्हायचं ते झालं. अलीबाबा आणि त्यांचे चाळीस गेले. यांनाच(उद्धव ठाकरे) कंटाळून गेले. हा माणूस कोरोना काळात भेटायला तयार नव्हता. आता अचानक बाहेर यायला लागला,' अशी टीकाही राज ठाकरेंनी केली.
एकनाथ शिंदेंना सल्ला
ते पुढे म्हणाले, 'एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन आधी सुरत आणि नंतर गुवाहाटीला गेले. गुवाटाही आणि गोवामार्गे मुख्यमंत्री झाले. मला त्यांना एवढंच सांगायचं आहे, तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, राज्यासाठी काम करा. उद्धव ठाकरे जिकडे सभा घेत आहेत, तुम्ही तिकडे जाऊन सभा करत बसू नका. हे तुम्हाला गुंतवून ठेवतील. राज्याचे काय? राज्याचे किती प्रश्न प्रलंबित आहेत. आज पेन्शनचा विषय आहे, शेतकऱ्यांच्या विम्याचा विषय आहे, अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालंय. त्यांना भेटा आणि मिटवा हे प्रश्न एकदाचे,' असेही ते यावेळी म्हणाले.